घरकुलासाठी लाभार्थी धडकले नगर परिषद कार्यालयावर !
By Admin | Updated: August 19, 2016 16:48 IST2016-08-19T16:48:32+5:302016-08-19T16:48:32+5:30
शासनाच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव नगर परिषदेने तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी घरकुल

घरकुलासाठी लाभार्थी धडकले नगर परिषद कार्यालयावर !
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १९ - शासनाच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दाखल प्रस्ताव नगर परिषदेने तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी घरकुल लाभार्थी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी वाशिम नगर परिषद कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाशिम शहरातील पंचशिल नगर, जुना बैल बाजार, माहुरवेश, दत्तनगर, बागवानपुरा, सौदागरपुरा, शुक्रवारपेठ, विटभट्टी परिसरासहीत शहरात इतरही भागात या योजनेचा लाभ मिळण्याकरीता यापूर्वी लाभार्थींनी १६ मे २०१६ रोजी घर बचाव घर बनाओ आंदोलन करुन न.प. कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकाऱ्यांनी न.प. कार्यालयाला पत्र देवून कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या.
अद्याप याबाबत ठोस कार्यवाही नसल्याने मानवी हक्क अभियान व लाभार्थ्यांनी शुक्रवारी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून हा मुद्दा निदर्शनात आणून दिला. मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष जगदीश इंगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रेखा रणबावळे, प्रदेशाध्यक्षा भारती डुरे, जिल्हा अध्यक्ष आत्माराम सुतार आदींनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, यावर निश्चित तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिले.