बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी
By Admin | Updated: April 28, 2017 14:10 IST2017-04-28T14:09:24+5:302017-04-28T14:10:36+5:30
एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला.

बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी
औरंगाबाद, दि. 28 - एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला. पोटच्या लेकारांप्रमाणे सांभाळले. एचआयव्हीबाधित असलेलाच जीवनसाथी तिच्यासाठी शोधला. या बाधितांचा विवाह सोहळा महाराष्ट्रदिनी १ मे रोजी आनंदवनात होणार आहे.
आई-वडिलांच्या निधनानंतर समाजासह नातेवाईकांनी झिडकारलेल्या मानसी व सुप्रिया (नाव बदललेले) दोन सख्ख्या बहिणी साधारण दहा वर्षांपूर्वी बीडच्या आनंदवनात दाखल झाल्या. अशा परिस्थितीत त्यांना ‘इन्फंट इंडिया’ने मायेची ऊब दिली. संचालक संध्या बारगजे व दत्ता बारगजे यांनी या दोघींना आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांना शाळेत पाठविले. आता मानसीला १८ वर्षे पूर्ण झाली असून, तिचे दहावीपर्यंत शिक्षणही झाले आहे. सुप्रिया आजही शाळेत जाऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
मानसीचे लग्नाचे वय झाल्याने तिचे हात पिवळे करण्याची जबाबदारी बारगजे दाम्पत्यावर होती. त्याप्रमाणे त्यांनी मुलाचा शोध घेतला आणि एक चांगला जीवनसाथी शोधून त्याच्याशी विवाह लावण्याचा निर्णय घेतला. मानसी ही १ मे रोजी बोहल्यावर चढणार आहे. तिला एक चांगला जीवनसाथी मिळाला असून, तो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहे. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आहे. या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी मंत्री, माजी मंत्री, प्रशासकीय अधिकारी, राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले असल्याचे दत्ता बारगजे यांनी सांगितले.
संसारोपयोगी साहित्य देणार भेट
विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते हे मानसीला संसारोपयोगी साहित्य भेट देणार आहेत. वऱ्हाडींसाठी चटणी-भाकर हा जेवणाचा मेन्यू असणार आहे. लग्नाचा सर्व खर्च सामाजिक बांधिलकी असणारे लोक उचलणार आहेत.
यापूर्वी चौघींचे कन्यादान
यापूर्वी इन्फंट इंडियातील चार मुलींचा विवाह सोहळा आनंदवनात पार पडला आहे. त्यांचे विवाह समाजातील लोकांनी केलेल्या मदतीवरच झालेले आहेत. सध्या या चौघींचे संसार सुखाने सुरू आहेत. यापैकी एका जोडप्याच्या घरी पाळणा हलला आहे. विशेष म्हणजे जन्मलेले हे मूल एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही.
कोठे आहे हे आनंदवन?
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून दहा कि.मी. अंतरावर पालीजवळील बिंदुसरा धरणाच्या उंच टेकडीवर हे आनंदवन उभारलेले आहे. येथे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एचआयव्हीबाधित लोक वास्तव्यास आहेत. यामध्ये चार महिला, २७ मुली व २८ मुलांचा समावेश आहे. येथे मुलांसाठी शाळा आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुले रोज बीड शहरात येतात.