तिथं हैवानांचा हैदोस, बीडला केंद्रशासित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:48 IST2025-01-13T16:46:14+5:302025-01-13T16:48:36+5:30
बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे असं माजी खासदारांनी म्हटलं.

तिथं हैवानांचा हैदोस, बीडला केंद्रशासित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मोठी मागणी
मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीमुळे सध्या राज्याच्या वर्तुळात बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आहे. बीडमधील गुन्हेगारी, जातीयवाद, दहशत येथील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या अजब मागणीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीडमधील घटनांवर बोलताना विनायक राऊतांनी बीडला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत, ते कोणालाही सोडणार नाही असं सांगतात परंतु गुंडांना पायबंदही घालत नाही. अशात जर बीड वासियांचे जीवन सुरळीत चालवायचं असेल, इथल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी चांगले वातावरण करायचे असेल तर बीडमधील संपूर्ण शासन व्यवस्था केंद्रशासित करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे. बीडला थेट केंद्रातून शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे तरच बीडला शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि सरपंचाचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे अशी भीतीही माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सरपंच हत्याकांड प्रकरणी सरकार अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये रोज नवेनवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे तरीही मुख्यमंत्री गंभीर नाहीत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र तो ही सरकार घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगठ्ठ झाल्याचं दिसून येते. ज्या क्रूर पद्धतीने देशमुख यांना चार तास मारलं गेलं त्याचा मी निषेध करते. जनावराला अस मारलं तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत असं सुरेश धस अस म्हणाले होते आणि हे असं बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झालं नाही, बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावं लागणार असून त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
धनंजय मुंडेंनी राजीनामाच द्यावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींना अटक करावी अशी मागणी करत दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. जवळपास २ तासांनी धनंजय देशमुख खाली उतरले मात्र तोपर्यंत सर्व ग्रामस्थ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित जमून धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरण्याची विनवणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली.