Dhananjay Munde Resignation: बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेराजीनामा सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट करून राजीनाम्यामागच्या २ कारणांचा खुलासा केला आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितले.
त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी खुलासा केला.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं.
प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढून घ्या
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडाचे सूत्रधार वाल्मीक कराड आहे. राजकारणात आल्यानंतर भावना संपतात का, आमचं सरकार कुणाविरोधात कारवाई करणार नाही का, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून सुन्न झालं. मुख्यमंत्री २ ओळीत राजीनामा आला, तो स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवला इतकेच बोलले. तुम्हाला संवेदनात नाहीत का, देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या त्या दिसल्या नाहीत का? विरोधी पक्ष फक्त घोषणेचा ड्रामा करतोय. तुम्हाला लोकांसाठी झटायला ठेवलंय. सामान्य माणसे चिरडली जातेय, यंत्रणा, प्रशासन राजकारण्यांसाठी काम करतायेत. कितीही राजकीय दबाव आला तरी चुकीचं काम करणार नाही अशी भूमिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. राजकारण्यांच्या हातातून प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढला सगळं नीट होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.