Late Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. अजून एक आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दिवंगत सरपंच देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई आदि कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत संवाद साधला.
सुप्रिया सुळे यांनी सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. आमची मागणी एकच आहे, ती म्हणजे लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. जे पोलीस यामध्ये सामील असतील, त्यांनाही सहआरोपी करावे. जे आरोपी आहेत, त्यांना शक्य तितक्या लवकर अटक करायला हवी आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. सहआरोपी अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाहीत. सुप्रिया सुळे ताईंनी आम्हाला न्यायाच्या भूमिकेतून साथ दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडेही न्याय मिळण्याचीच मागणी करते, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.
या दुःखातून सावरणे आता कठीण आहे
आईला वेड लागल्यासारखे झाले आहे. त्या दिशेला इथून पुढे कसे कुणाला पाठवणार? आम्ही खूप आनंदी होतो, पण आता कठीण झालं आहे. कुणी वेळेवर जेवत नाही, झोप लागत नाही. या दुःखातून सावरणे आता कठीण आहे, अशी व्यथा वैभवी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. तसेच सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. संतोष देशमुखने सगळ्या गावाचे चांगले केले. भांडणादिवशी तो म्हणाला असेल की, मला मारू नका. पण त्याला मारले. माझे जसे लेकरू आहे तसे या मारेकऱ्यांना लेकरू असेल ना? त्यांना मुले, बायका नसेल का? माझे लेकरू खूप चांगले होते. मी आता काय करू? त्याला कुठे शोधू? असे संतोष देशमुख यांच्या आईने म्हटले आहे.
दरम्यान, देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी इथे भाषण करायला आलेली नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहे. वैभवी कोणाची तरी लेक आहे, मीही कोणाची तरी लेक आहे. आपल्या मूलाचे निधन आईसाठी सर्वांत मोठे दु:ख आहे. मी यापूर्वी माझ्या मावशीच्या मुलाला लहान वयात गमावले आहे. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असली तरी माझी मावशी आजही सावरू शकलेली नाही. या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देणार आहे. कोण जबाबदारी घेतो किंवा घेत नाही, याची मला पर्वा नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा मी थांबवणार नाही. मी महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेन. सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे. मी कोणाशीही तडजोड करणार नाही.