Dhananjay Deshmukh News: भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महंत नामदेवशास्त्री यांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
आमची एवढीच मागणी आहे की...
पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, मी त्यावर काही बोलणार नाही. माझ्या भावाची हत्या झाली, त्याबाबत मी न्याय मागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आमचा विश्वास आहे. या प्रकरणात राजकारण होत असते तर जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी यात उतरले नसते. हे सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे, पक्षाचे आहेत, विविध संघटनेचे आहेत. ते सगळे जण देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, याचीच मागणी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत राजकारण होत नाही, असे देखमुख म्हणाले. तसेच आरोपींना फाशी द्या, एवढीच आमची मागणी आहे. जे आरोपी नाही, त्यांच्याबद्दल आम्ही कधीच काही बोललो नाही. कागदोपत्री जे आरोपी फरार आहेत, त्याबाबत कारवाई झालेली नाही. ते सापडत नाहीत. आधीच कारवाई झाली असती, तर हे प्रकरण झालेच नसते. एका दलित बांधवाची मदत करण्यासाठी सरपंच तिथे गेले, ते गेले नसते, तर त्या दलित बांधवालाही मारले असते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून थेट भगवानगडावर पोहोचले. श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे धनंजय मुंडे यांनी प्रथम संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. मुंडे यांनी शास्त्रींसोबत भोजन केले आणि तिथेच मुक्काम केला. यानंतर नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.