जलसाक्षर बनू या!

By Admin | Updated: July 20, 2016 05:20 IST2016-07-20T05:20:32+5:302016-07-20T05:20:32+5:30

माणसाला पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Become a hybrid or! | जलसाक्षर बनू या!

जलसाक्षर बनू या!


माणसाला पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेस्तवर त्याचा पाण्याशी संबंध येतो. एवढेच नव्हे, तर रात्री झोपेतून जाग आल्यावरसुद्धा त्याला आठवणे येते ती पाण्याचीच. झोप चाळवली की तो उठतो, एक ग्लास पाणी पितो व पुन्हा निद्रेच्या आधीन होतो. सकाळी मुखमार्जन करणे, अंघोळ करणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, अंगणात सडा संमार्जन करणे, घर साफ करणे, बगीचाला पाणी देणे, वाहने साफ करणे या सर्व कामांसाठी पाणी लागते.
शेती तर पाण्याशिवाय होऊच शकत नाही. शेती कसण्याच्या कोरडवाहू शेती व बागायत शेती अशा दोन पद्धती आहेत. कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. जर पिकांना देण्यासाठी पाणी असेल, तर शेती उत्पादनात दुपटीने वा तिपटीने वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की, शेती कसणे कोरडवाहू असो वा बागायती असो, पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही.
आपण दररोज वीज वापरतो, ती कशी निर्माण होते हो? ती अणुशक्तीपासून, कोळशापासून, हवेपासून, सूर्यशक्तीपासून वा पाण्यापासून निर्माण केली जाते. अणुशक्तीपासून निर्माण होणारी वीज बरीच महाग असते. त्यापेक्षा स्वस्त वीज कोळशापासून तर सर्वात स्वस्त वीज पाण्यापासून निर्माण होते. अजून आपल्या देशात बाकीच्या स्रोतांपासून म्हणावी तेवढी वीज निर्माण होत नाही. देशात नद्यांवर धरणे बांधून त्या ठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्प उभारले जातात व तिथे वीज निर्माण करून ती सर्वत्र वितरित केली जाते.
आज कारखानदारी सर्वत्र आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. ती तरी पाण्याशिवाय चालू शकते काय? मुळीच नाही. कारखान्यातील यंत्रे थंड ठेवण्यासाठी, कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, मजुरांसाठी बांधलेली स्वच्छतागृहे साफ ठेवण्यासाठी, उपहारगृहातील अन्न शिजवण्यासाठी, एअर कंडिशनिंगची यंत्रे चालवण्यासाठी पाणी आवश्यकच ठरते. सर्वसामान्य जीवन असो, शेती असो, शक्ती असो, कारखानदारी असो वा प्रवास असो सर्वांना पाणी हा आधार असतो व त्याचेमुळेच आपले जीवन सुसह्य होते.
सध्या पाण्यासाठी जी मारामार चालू आहे, त्यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. शहरातले अनेक नागरिक पाण्याशिवाय हवालदिल झाले आहेत. मनमाडला महिन्यातून एकदा, धुळ्याला आठवड्यातून एकदा, औरंगाबादला तीन दिवसांतून एकदा, तर पुण्याला दिवसाआड पाणी पुरविले जाते. ही पाळी आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल, तर पाण्याबाबत आपण जास्त जागरूक असले पाहिजे. सर्व समाज जलसाक्षर झाला, तर ही वेळ आपल्यावर येणार नाही. चला तर मग, आपणही जल साक्षर बनू या.
- डॉ. दत्ता देशकर

Web Title: Become a hybrid or!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.