आम्ही इकडं असल्यानं कलाकारांचं बरं चाललंय!
By Admin | Updated: August 5, 2016 05:02 IST2016-08-05T05:02:41+5:302016-08-05T05:02:41+5:30
राजकारणातील मंडळी ही मराठी रंगभूमीवरील नटच काय हॉलिवुडच्या स्टार्सनाही फिके पाडण्याच्या क्षमतेचे ‘कलाकार’ असतात

आम्ही इकडं असल्यानं कलाकारांचं बरं चाललंय!
मुंबई : राजकारणातील मंडळी ही मराठी रंगभूमीवरील नटच काय हॉलिवुडच्या स्टार्सनाही फिके पाडण्याच्या क्षमतेचे ‘कलाकार’ असतात. त्यांच्या मनातील भाव चेहऱ्यावर उमटू देत नाहीत, असा चिमटा अभिनेते प्रशांत दामले यांनी घेताला आणि त्यावर लागलीच आपल्या तिरकस शैलीतील वक्तव्याकरिता सुपरिचित असलेले आमदार दिलीप सोपल यांनी आम्ही इकडं असल्यानं तुम्हा कलाकारांचं तिकडं बरं चाललय, अशी कोपरखळी दामले यांना लगावली.
बेस्टमध्ये नोकरीला असताना राणे यांचा करडा स्वर आपण ऐकला आहे. ते राणे हल्ली का दिसत नाही, असे दामले यांनी विचारताच राणे म्हणाले, मी आहे तसाच आहे. कुठलीही व्यक्ती जन्माला आल्यापासून तिचे जे गुणधर्म असतात त्यात फरक पडत नाहीत. माझ्यातही तो पडलेला नाही. अर्थात शालेय जीवनात किंवा तरुण असताना माणूस जसा असतो तसा तो वेगवेगळ््या क्षेत्रात वावरल्यावर रहात नाही. मी आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे मला कसेही वागावे असे वाटले तरी वागता येत नाही.
गोंधळामुळे बंद पडणारे सभागृह आणि कामकाजावरील खर्च यावरून दामले यांनी जयंत पाटील यांना छेडले असता ते म्हणाले की, लोकशाही व्यवस्था टिकवण्याचे मोल अमूल्य असते. त्याचे पैसे मोजणे बरोबर नाही. चर्चेत मतभेद झाल्यावर गोंधळ होतो. कामकाज बंद पडते. अशावेळी विधानसभाध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती यांच्या दालनात विचारविनिमय होतो. सर्व चर्चा सभागृहातच व्हायला हव्या असे काही नाही.
अभिनयगुण पाहून तिकीट देतात का, यावर सोपल म्हणाले, हे सर्व उत्स्फूर्त असते आणि प्रसंगानुरूप करावे लागते. नाटकात एखादा नट आला नाही तर त्याची भूमिका दुसरा करतो तसेच हे आहे. आम्ही मंडळी इकडं असल्यानं तुमचं तिकडं बर चाललं आहे, अशी कोपरखळी सोपल यांनी दामलेंना लगावली. लॉबीतील सभागृहाच्या टिप्पणीचा समाचार घेताना सोपल म्हणाले की, सभागृहात काही सदस्य हे न कळणाऱ्या विषयावरही बोलतात. त्यामुळे कंटाळून सदस्यांनी घरी जाऊ नये याकरिता हसवून मी त्यांना थांबवतो. आपल्या या मैफिलीचा सर्वांनीच आनंद घेतला आहे. जो माझ्या सभागृहात येतो तो आतल्या सभागृहात टिकून राहतो आणि जो आत जास्त बोलतो तो परत निवडून येत नाही, अशी टिप्पणी सोपल यांनी करताच सभागृहात हास्यस्फोट झाला.
सध्या वाहिन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांवर तिसरे सभागृह भरते याबद्दल दामले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना छेडले असता ते म्हणाले की, हे खरे आहे. सभागृहात चार शब्द बोललेले काही सदस्य वाहिन्यांच्या कॅमेरासमोर जाऊन १० शब्द बोलून मोकळे होतात. सभागृहात काही ठराविक मंडळी सदस्य काय बोलतो ते ऐकत असतात. मात्र वाहिनीवर बोलल्यावर तीच गोष्ट जगभर जाते. त्यामुळे कॅमेरासमोर अधिक जोरात सांगायची प्रथा रुढ झाली आहे. काही सदस्य तर सभागृहात न बोलताच बाहेर बोलून मोकळे होतात. या तिसऱ्या सभागृहाखेरीज दिलीप सोपल यांचे वेगळे सभागृह लॉबीत भरते. त्यातून ते वातावरण हलकेफुलके ठेवतात, असे महाजन यांनी जाहीर केले.
(विशेष प्रतिनिधी)
>लोकमत विधिमंडळ पुरस्कार २०१६ या सोहळ्यात ‘विधिमंडळात होते तरी काय?’ या विषयावरील परिसंवाद चांगलाच रंगला. सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. दिलीप सोपल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना बोलते केले.