वर्ध्यात पुन्हा एका शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
By Admin | Updated: August 17, 2016 14:13 IST2016-08-17T14:13:21+5:302016-08-17T14:13:21+5:30
आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने पुन्हा हल्ला चढवला आहे.

वर्ध्यात पुन्हा एका शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. १७ - आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर त्या अस्वलाने पुन्हा हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर पवार (४५) रा. मोई असे जखमीचे नाव आहे. अस्वलाचा हा तिसरा हल्ला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मोई व माणिकवाडा या दोन गावातील शेतकऱ्यांवर अस्वल व तिच्या दोन पिलांनी हल्ला चढविला होता.
१५ दिवसांपूर्वी अशाचप्रकारे एका शेतकऱ्यावर अस्वलाने दुसऱ्यांदा हल्ला केला होता. यामुळे संतप्त होऊन सुमारे २५०० नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना चार तास वेठीस धरले होते. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्या अस्वलाची दहशत घालविण्याच्या तात्काळ सूचना वनविभागाच्या येथील अधिकाऱ्यांना दिल्या
होत्या. दि. ४ आॅगस्टपासून एसआरपीच्या २२ जवानांनी मोई, माकिणवाडा, कोल्हाकाळी जंगलात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. १५ आॅगस्टपर्यंत अस्वलाचा कुठेही शोध लागला नाही. आता अस्वल या भागात नाही. आता दहशत संपली, असे गृहीत धरुन कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्यात आले होते. अस्वलाची भीती नसल्याचे हेरुन ज्ञानेश्वर पवार हे दुसऱ्याच दिवशी रात्री शेतात जागलीला गेले. वन्यप्राणी त्यांच्या शेतातील भुईमुंगाची नासाडी करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अंधार असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. ज्ञानेश्वरने रानडुक्कर समजून हाकायचा प्रयत्न करताच दबा धरून बसलेल्या अस्वलाने एकाएकी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये त्यांना त्यांच्या पाय, छाती व कंबरेच्या भागाचे लचके तोडून गंभीर जखमी केले.
आरडाओरडा केल्यावर परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी ज्ञानेश्वरची अस्वलाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार यांना दिली. त्यांनी रुग्णवाहिका पाठवून जखमीला
अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचाराकरिता हलविले.
ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी मोई गावात रात्रीच भेट देवून परिस्थिती व शांततामय वातावरण कायम ठेवण्यास यश मिळविले. या हल्ल्यामुळे मोई गावात पुन्हा एकदाअस्वलाची दशहत निर्माण झाली आहे.
भुईमूगाचे पीक धोक्यात
खरीपातील भुईमूग पीक वनप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्रीला नाईलाजास्तव शेतकऱ्यांना जागलीसाठी जावे लागत आहे. महिनाभरापासून अस्वल व तिच्या दोन पिलांनी या शिवारात चांगलीच दहशत माजविली आहे. परिणामी शेतकरी शेतावर वा जागलीसाठी जाण्यास कचरत आहे.