सावधान! रेल्वेचा वेग वाढतोय

By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T21:18:25+5:302014-11-02T23:29:42+5:30

अपघातांची कारणे संशोधनाचा विषय : सुरक्षेकडे लक्ष न दिल्यास प्रवास धोक्याचा

Be careful! Railway speed is growing | सावधान! रेल्वेचा वेग वाढतोय

सावधान! रेल्वेचा वेग वाढतोय

रजनीकांत कदम - कुडाळ -१६ वर्षांच्या प्रवासानंतर गेल्या काही महिन्यात कोकण रेल्वे वारंवार ट्रॅॅक सोडून धावत असून या नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचा वेग वाढत असल्याने प्रवाशांना सावधान रहावे लागणार आहे. कारण ट्रॅक सोडून धावल्यामुळे लागोपाठ पाच अपघात या रेल्वेला झाले आहेत. यामागे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष हे कारण आहे का? असा प्रश्न पडत असून भविष्यात ही स्थिती कायम राहिल्यास पैसे भरा आणि जीव धोक्यात घालून प्रवास करा, अशी स्थिती प्रवाशांची होणार यात तीळमात्र शंका नाही.
अनेक आव्हानांना सामोरे जात मोठ्या कष्टाने पूर्णत्वास आलेल्या कोकण रेल्वेने १६ वर्षे पूर्ण केली आहेत. या देशाचे तत्कालीन अर्थमंत्री, रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांनी कोकणातील जनतेला चाकरमान्यांना मुंबई अधिक जवळ व्हावी, जनतेचा विकास झटपट व्हावा, त्यांना सुखरूप प्रवास करता यावा, याकरिता पाहिलेले कोकण रेल्वेचे स्वप्न कोकणवासीयांसाठी प्रत्यक्षात अवतरले.
चाकरमान्यांसाठी कोकणात यायचा प्रवास अत्यंत खडतर, त्रासदायक व धोकादायक होत होता. त्याकाळी मुंबईच्या चाकरमान्यांची गावातील घरातील व्यक्तींशी कमी प्रमाणात संपर्क होत असे. मात्र, कोकण रेल्वे सुरू झाली आणि मुंबई व कोकण अत्यंत वेगाने जवळ आले. नंतर कोकण रेल्वे कोकणापुरतीच मर्यादित न राहता पुढे गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि देशाचे दक्षिण टोक कन्याकुमारीपर्यंत जोडली गेली. दुर्ग, डोंगर, दऱ्या, नदीनाले पार करीत, अनेक कामगारांची बलिदाने स्वीकारत अखेर १९९८ साली प्रत्यक्षात पहिली कोकण रेल्वे या मार्गावरून धावली.
१६ वर्षे अव्याहतपणे कोकणवासीयांची सेवा करणाऱ्या या रेल्वेला गेल्या काही वर्षात मात्र दोन-तीन अपघात झाले. मात्र, यंदा एप्रिल महिन्यापासूनच्या सहा महिन्यात पाच मोठे अपघात झाले. त्यामुळे कोकण रेल्वेला कोणाची नजर लागली का, की प्रशासनाचे या मार्गावरील दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दगड, माती घसरू नये, म्हणून रक्षक जाळीवर करोडो रुपये खर्च केले. रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी केली. मात्र, ट्रॅकची क्षमता पाहून डागडुजी करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे ही अनेक डोंगरदऱ्या, नदीनाले पार करून आलेली असल्याने एखाद्या वेळी अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत पोहोचविणे अत्यंत कठीण काम होऊन बसते. अपघात बोगद्यात झाल्यास तर फारच बिकट परिस्थिती ओढवते.
कोकण रेल्वेला एकच ट्रॅक असल्यामुुळे अपघात झाल्यास पूर्ण वेळापत्रक कोलमडते व प्रवाशांचा अनेक तास खोळंबा होतो. काहीवेळा तर अन्न, पाणी आदी सुविधा संपल्याच्याही घटना घडल्या आहेत.
कमी मेंटनेन्स करणाऱ्या रेल्वे विभागासाठी हा पुरस्कार दिला जातो. कोकण रेल्वेचा मेन्टनेन्स खर्च गेल्या दोन वर्षात अत्यल्प करण्यात आला आहे. एखाद्या अधिकाऱ्याला तो खर्च मिळवून देण्यासाठी खर्च कमी करण्यात येतो की, अन्य कारणासाठी? हा संशोधनाचा विषय असून यामुळे प्रवाशांनाच धोका उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात या मार्गावर अत्यंत धोकादायक स्थिती असते. त्यामुळे या रेल्वेची गती कमी करण्यात येते. असे असूनही पाच अपघात घडलेच. आता १ नोव्हेबरपासून येथील सर्व रेल्वेंची गती वाढविण्यात येणार असल्यामुळे सर्व प्रवाशांनी सावधानता बाळगणे हेच उचित ठरणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या ठिकाणी काय चुका होत आहेत, कोकण रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे काय, अपघात होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेच्या कारभाराकडे सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कोकण रेल्वेवर होणाऱ्या अपघातांबाबत कोकण रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत राहिल्यास व येथील लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्यास कोकणातील सर्व जनता आणि प्रवाशांनी याविरोधात एकत्र येणे काळाची गरज आहे.

कोकण रेल्वे मार्गावर १00 बोगदे
वारंवार अपघात होण्याची कारणे
१६ वर्षे होऊनही या मार्गाच्या ट्रॅकच्या दुरुस्तीकडे कोकण रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. पावसामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह किंवा चिखल यामुळे ट्रॅकमधील खडी वाहून जाते किंवा खचलेल्या जमिनीबरोबर खचते. खडीचे प्रमाण कमी होत असल्याने ट्रॅक काही ठिकाणी वाकडे होतात. ट्रॅकवर जॉइंट बऱ्याच प्रमाणात असल्याने वाकड्या ट्रॅकवरून रेल्वे गेल्यावर ट्रॅक तुटण्याची शक्यता असते. गेल्या दोन वर्षात दुरुस्ती केली नसल्याची शक्यता आहे. मालगाड्या ओव्हरलोड असतात. ट्रॅकमन आणि इतर आवश्यक कर्मचारी वर्गाची संख्या कमी आहे.
अपघातांची चौकशी कुठे?
झालेल्या अपघातांची योग्य प्रकारे चौकशी, तपासणी होऊन अहवाल सादर केला जाईल. मात्र, अजूनही झालेल्या अपघातांची कारणे पुढे आली नाहीत. त्यामुळे झालेल्या अपघातांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न समोर येतो.

कोकण रेल्वेचा मार्ग म्हणजे जगातील एक आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण या मार्गात सुमारे १०० बोगदे असून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब बोगदा, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच रेल्वेपूल या मार्गात येतात. आव्हानात्मक बोगदे व उंच, लांब रेल्वे ब्रीजचा प्रवास तसेच संपूर्ण प्रवास हा निसर्गसंपन्न अशा कोकण भूमीतून होतो, हे खास.
सहा महिन्यात पाच अपघात
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात या रेल्वेला पाच अपघात झाले. हे सर्व अपघात रेल्वे रुळावरून घसरल्यानेच झाले. यामध्ये ११ एप्रिल रोजी आडवली ते निवसर दरम्यान मालगाडीचे इंजिन पहाटे ३ वाजता घसरले होते. १४ एप्रिल रोजी उक्षी येथे मालगाडीचे इंजिन घसरले. ४ मे रोजी दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला नागोठणे येथे मोठा अपघात होऊन १८ मृत्यूमुखी पडले, तर १५० हून अधिक जखमी झाले. २५ आॅगस्ट रोजी ऐन गणेश चतुर्थीच्या काळात करंजाळी येथे मालगाडी घसरून दोन दिवस वाहतूक ठप्प होती. ८ आॅक्टोबर रोजी मालगाडीचे सुमारे १२ डबे घसरले होते. परंतु सुदैवाने मोठी हानी टळली होती.

११ वर्षांपूर्वी ५२ जणांचा मृत्यू
२३ जून २००३ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हॉली डे एक्स्पे्रसला वेर्ले बोगद्याजवळ भीषण अपघात होऊन सुमारे ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
एप्रिल महिन्यात दोन, मे महिन्यात एक असे तीन अपघात झाले, तरी कोकण रेल्वे प्रशासनाला याचे गांभीर्यच नाही. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात २५ आॅगस्ट रोजी झालेल्या अपघातामुळे दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती.
कोकण रेल्वे प्रशासनाला अपघातांच्या घटनांचे कोणतेही गांभीर्य नसून ते निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या जिवीताशी खेळण्याचाच हा एक भाग आहे.

Web Title: Be careful! Railway speed is growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.