गडकरींच्या गादीसाठी लढाई

By Admin | Updated: June 19, 2014 00:56 IST2014-06-19T00:56:43+5:302014-06-19T00:56:43+5:30

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान होत आहे. आजवर ही जागा भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ताब्यात होती.

Battle for the throne of Gadkari | गडकरींच्या गादीसाठी लढाई

गडकरींच्या गादीसाठी लढाई

पदवीधर निवडणूक : सोले, तायवाडे, गजभिये रिंगणात
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान होत आहे. आजवर ही जागा भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ताब्यात होती. यावेळी भाजपचे महापौर अनिल सोले, काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे व फुले, शाहू आंबेडकर पदवीधर संघटनेचे किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. काट्याची लढत पाहता रिंगणातील इतर उमेदवारांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
१९८९, १९९६, २००२ व २००८ अशा चारही निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी या मतदारसंघात बाजी मारली. यावेळी गडकरी यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवित एकतर्फी विजय नोंदविला. त्यामुळे आता या मतदारसंघाचे नेतृत्व गडकरी कुणाकडे सोपवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात नागपूरचे महापौर अनिल सोले यांना उमेदवारी देण्यात आली. सोले यांच्यासाठी गडकरी यांनी मेळावे घेतले.
भाजपचे सहाही जिल्ह्यातील कॅडर ताकदीने कामाला लागले. प्रश्न गडकरींची गादी कायम राखण्याचा असल्यामुळे सोले यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. गेल्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांचे उमेदवार डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले होते. गडकरी यांनी ५२ हजार ७६१ मते म्हणजे एकूण मतदानाच्या ५४.६३ टक्के मते घेत ही निवडणूक एकतर्फी केली होती. तायवाडे यांना २८,८३६ (२९.८६ टक्के) मते मिळाली होती. यावेळी तायवाडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंचे अधिकृत उमेदवार आहेत. तायवाडे यांच्यासाठी यावेळी प्रदेश व शहर काँग्रेसने बराच जोर लावला. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे फुले शाहू आंबेडकर पदवीधर संघटनेकडून रिंगणात उतरले आहेत.
आंबेडकरी संघटनांमध्ये त्यांचे तगडे नेटवर्क आहे. मतदार नोंदणीपासून ते सक्रिय होते. बसपाने त्यांना समर्थन दिल्याने सामना तिरंगी झाला आहे.
याशिवाय भाजपचे बंडखोर महेंद्र निबार्ते, पांडुरंग डबले, अब्दुल सिद्धीकी, अर्चना महाबुधे, अमोल हाडके, राजेंद्र कराळे, गोकुल पांडे, चंद्रकांत गेडाम, महादेव पाटील, राजेंद्र लांजेकर, तीर्थराज हरिणखेडे या उमेदवारांनी ही निवडणूक अधिकच टफ केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Battle for the throne of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.