धक्कादायक! मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:48 IST2025-01-23T16:47:13+5:302025-01-23T16:48:09+5:30
Ladki Bahin Yojana: विरोधक सातत्याने लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका करत असून, बांगलादेशातून आलेल्या घुसखोर महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे.

धक्कादायक! मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली. लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर महायुती सरकारने ही योजना आणली. राज्यात ही योजना प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यातच या योजनेवरून विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एकीकडे ही योजना बंद केली जाणार असल्याचे दावे करताना दुसरीकडे या योजनेसाठी आश्वासित केलेले २१०० रुपये कधीपासून देणार, अशी विचारणाही करत आहेत. यातच आता बांगलादेशातून घुसखोरी करून मुंबईत राहत असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महायुती सरकारची नवीन टर्म सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यामुळे या छाननीत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून मिळालेल्या पैशांची वसुली केली जाऊ शकते, अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. यावर, राज्यातील कुठल्याही अपात्र लाभार्थी महिलेकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. छाननी प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यास ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत, हे अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे शासन परत घेणार की नाही, त्याविषयी गैरसमज पाहायला मिळत आहेत. एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग विंडो तयार करून देतील. आम्ही कुणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही, ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, असेही अदिती तटकरे म्हणाल्या.
मुंबईतबांगलादेशी घुसखोर महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?
एकीकडे बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांबाबत केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडक पावले उचलताना पाहायला मिळत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चर्चिला जात आहे. बांगलादेशातील परिस्थिती बदलल्यानंतर भारतात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. यातच मुंबईत बांगलादेशी घुसखोर महिलांनी थेट माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक केली आहे. याप्रकरणी एका दलालालाही अटक केली आहे. या बांगलादेशी महिलेने भारतात घुसखोरी केली त्यानंतर बनावट कागदपत्रे बनविली आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. एजंटकडून बनावट कागदपत्रे बनवली होती. या एजंटलादेखील अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला पुण्यात अटक केली होती. आरोपी गेल्या २० वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली होती आणि कोलकातामध्ये जन्म प्रमाणपत्र बनवले होते. यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबई मार्गे पुण्याला पोहोचला. मुंबई, ठाणे, पुणे आणि भिवंडी येथे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी कागदपत्रेही सापडली.