बँड, बाजा, बारात... सारंच आउटसोर्सिंग
By Admin | Updated: November 10, 2014 00:41 IST2014-11-10T00:38:43+5:302014-11-10T00:41:55+5:30
विवाह सोहळा, ‘नो टेन्शन’ : लग्नपत्रिका, भटजी, वरातीपासून पाठवणीपर्यंतच्या सर्व सेवा

बँड, बाजा, बारात... सारंच आउटसोर्सिंग
इंदुमती गणेश - कोल्हापूरमंगल कार्यालयाची तारीख मिळाली नाही, वरातीचा घोडा बुक आहे, हॉलची सजावट कोण करणार?... जेवणाचे सगळे साहित्य आचाऱ्याला दिले की नाही, रुखवतातील एक वस्तूच आणायची राहिली... मानपान, रुसवे-फुगवे या ताणतणावात कुटुंबीयांना आपल्या लाडक्या मुला-मुलीच्या विवाहाचा आनंदच घेता येत नाही. आता मात्र कुटुंबीयांची ही जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी पेलली आहे. लग्नपत्रिकेपासून भटजी, सजावट, वरात, व्हिडिओ शूटिंग-छायाचित्र, जेवणावळी ते पाठवणीपर्यंतच्या सगळ्या सेवा यात पुरविल्या जातात. त्यामुळे आता कुटुंबीयांनी फक्त विवाह सोहळ्याचा आनंद लुटायचा.
तुलसी विवाहानंतर आता दोन मनं, कुटुंबं आणि संस्कृतीचे मिलन घडविणाऱ्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. ‘लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून’ अशी एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की, या काळात जो काही खर्च होतो किंवा जी काही धावपळ करावी लागते, त्यातून आपल्या गाठीशी अनेक चांगले-वाईट अनुभव बांधले जातात. लग्न पार पडेपर्यंत दोन्ही बाजूंच्या मंडळींचा जिवात जीव नसतो. त्यामुळेच हा ताण हलका करण्यासाठी गेल्या काही वर्षांत ‘वेडिंग आॅर्गनायझर’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय होत आहे.
सबकुछ... इव्हेंट मॅनेजमेंट
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला एकदा आपले बजेट, अपेक्षा, सोहळ्यातील विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची संख्या सांगितली की त्यानुसार लग्नाचे नियोजन केले जाते. कमीत कमी दीड लाख रुपयांपासून हे कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. ग्राहकाला उत्तम सेवा हे ब्रीद ठेवून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या काम करीत असतात. त्यामुळे आपण फक्त आदल्या दिवशी मंगल कार्यालयात जायचे आणि जिवलगांचा विवाह सोहळा डोळ्यांत साठवायचा. मात्र, काहीवेळा कुटुंबाला या कंपन्यांच्या भोंगळ कारभारालाही सामोरे जावे लागते; त्यामुळे कंपनीची विश्वासार्हता जोखूनच आपल्या विवाह सोहळ्याची जबाबदारी सोपविणेच योग्य ठरते, अन्यथा मनस्तापच सहन करावा लागतो.
पुरीभाजी आउटडेटेड
पूर्वी लग्न म्हटले की श्रीखंड किंवा फार तर गुलाबजामुन, पुरी, भाजी, मसालेभात, भजी असा ठरलेला मेनू असायचा. आता मात्र हे पदार्थ हद्दपार होऊन त्यांची जागा पनीर टिक्का, मिक्स व्हेज, दाल तडका, कश्मिरी पुलाव, व्हेज हैदराबादी, भजीऐवजी कटलेट, रोल कटलेट. गोड पदार्थांत गाजर-दुधी हलवा, रबडी, फ्रुटखंड, बासुंदी, रसमलाई, रसगुल्ला यांची वर्णी लागली आहे.
याशिवाय जेवणासोबत सॅलड, आइस्क्रीम, लहान मुलांचा खाऊ, पंजाबी-साउथ इंडियन डिशेस, आलेल्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक अशा नवनवीन पदार्थांची मेजवानी दिली जात आहे.
आता लग्न सोहळ्याला पुरी-भाजीऐवजी पंजाबी, हैदराबादी अशा विविध प्रकारच्या मेनूची मागणी केली जाते. याशिवाय स्वच्छता, सर्व वाढपी ड्रेस कोडमध्ये यावर विशेष भर दिला जातो. विवाहाचे मुहूर्तच इतके असतात की, अनेकदा आम्ही एका दिवसात दोन लग्नांना केटरिंगची सेवा पुरवितो.
- सादिक काले (फुडताज केटरिंग सर्व्हिस)
काळानुसार विवाह सोहळ्याचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे आपले कार्य अधिक देखण्या व शिस्तबद्ध रितीने व्हावे, या दृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंटला अधिक महत्त्व आहे. आम्ही हॉलपासून भटजी, वाजंत्री, नववधूचे आगमन या सगळ्या सेवा पुरवितो. ग्राहकांच्या अपेक्षा आणि बजेटनुसार सोहळ्याचे नियोजन केले जाते.
-मिलिंद अष्टेकर (ओंकार इव्हेंट्स)
पंचांगानुसार दिलेल्या विवाह मुहूर्तांव्यतिरिक्त काढीव मुहूर्तांवरही मोठ्या प्रमाणात लग्ने लावली जातात. बहुतांश लग्नांत मुहूर्तावर अक्षता पडतच नाहीत. पाहुणेरावळे, मुला-मुलीचे मामा किंवा तयारी या सगळ्यांत किमान पाच-सात मिनिटे मुहूर्त पुढेच गेलेला असतो. त्यामुळे शुभ दिवस किंवा मुहूर्त हे आपल्या मानण्यावर असते.
- शशिकांत स्वामी (पुरोहित)
‘वेडिंग आॅर्गनायझर’ संकल्पना होतेय रूढ
नव्या संकल्पनेमुळे कुटुंबाला सोहळ्याचा आनंद घेता येतो.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आपल्या फक्त अपेक्षा, बजेट सांगा
किमान दीड लाख रुपयांपासून
कान्ट्रॅक्ट दिले जाते.
आपण फक्त आदल्या दिवशी कार्यालयात जायचे, अन् सोहळा डोळ्यांत साठवायचा.