PM Modi Cabinet Expansion: “केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास आनंदच होईल”; शिंदे गटातील खासदाराची ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:51 IST2023-01-07T16:50:41+5:302023-01-07T16:51:59+5:30
PM Modi Cabinet Expansion: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात शिंदे गटाला स्थान मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

PM Modi Cabinet Expansion: “केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास आनंदच होईल”; शिंदे गटातील खासदाराची ‘मन की बात’
PM Modi Cabinet Expansion: येत्या १७ जानेवारीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदलाची शक्यता वर्तविली जात आहे. हा फेरबदल १७ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान कधीही होऊ शकतो. कोण राहणार, कोण जाणार, कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता शिंदे गटातील एका खासदाराने मंत्रिमंडळात संधी मिळण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाल्यास आनंद होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे आहे, मंत्रिपदाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. पण मी तीन वेळा आमदार आणि खासदार राहिलो आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने करायला तयार आहे. पक्षाचा नावलौकीक वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
संजय राऊत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील घाण आहेत का?
प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी आम्हाला दलाल कचरा म्हटले. तुम्ही याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर निवडून आला आहात. तुम्हाला जर मत देणारे कचरा असतील तर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील कोण आहात? संजय राऊत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील घाण आहेत का? अशी विचारणा जाधव यांनी केली.
२०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार
२०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ज्या राज्यांत भाजपची स्थिती कमजोर आहे, अशा राज्यांतील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात घेतले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही ज्येष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठविले जाईल, एवढे मात्र निश्चित आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे आता कोणालाच माहिती नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला स्थान दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी अनेक खासदारांची नाव चर्चेत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"