बालगोविंदा आणि हंडीच्या २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बंदी कायम
By Admin | Updated: August 17, 2016 14:21 IST2016-08-17T12:55:28+5:302016-08-17T14:21:44+5:30
दहीहंडी उत्सवजवळ आला असताना सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

बालगोविंदा आणि हंडीच्या २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बंदी कायम
ऑनलाईन कायम
मुंबई, दि. १७ - दहीहंडी उत्सव जवळ आला असताना सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा २०१४ सालचा निर्णय कायम ठेवला आहे.
या निर्णयानुसार बाल गोविंदावरील बंदी कायम ठेवताना दहीहंडींची कमाल उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या नियमांबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी पथकात सहभागी होता येणार नाही. दहीहंडी नियमांबद्दल सुस्पष्टता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.
मुंबईत दहीहंडी उत्सव न रहाता इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईत गलोगल्ली लागणा-या लाखो रुपयांच्या हंडया फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये जीवघेणी स्पर्धा वाढत चालली होती. यामध्ये हंडी फोडताना पडून अनेक गोविंदा जखमी व्हायचे. काहींचा मृत्यू व्हायचा. म्हणून दहीहंडी उत्सवाला नियमांमध्ये बसवण्यासाठी उच्च न्यायालयाच याचिका दाखल झाल्या होत्या.
उच्च न्यायालयाने हंडीतील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन हंडीची उंचीवर काही मर्यादा आणल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालामुळे विक्रमी उंची गाठण्याची स्पर्धा करणारी गोविंदा पथके निराश होणार आहेत.
ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचे संघर्ष, सचिन भाऊ अहिर यांचे संकल्प दहीहंडी उत्सवाचे मुख्य आयोजक आहेत. गेल्यावर्षी जाचक नियमांचा कारण पुढे करुन या दोन्ही नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन टाळले होते.