पनवेल - राज्यात २९ महापालिका निवडणुकीमुळे जोरदार राजकारण तापले आहे. बऱ्याच महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवलीत भाजपा महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध आले आहे. पनवेलमध्येही ७ उमेदवारांची माघार घेतल्याने भाजपा उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यातच मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी खळबळजनक आरोप करत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
मनसे प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की, पनवेलमध्ये घोडेबाजाराला ऊत आला आहे. निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना ५०-६० लाखांचे आमिष दिले जात आहे. त्याशिवाय अनेक उमेदवार नॉट रिचेबल आहे. उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव आणला जातोय. इतक्या भयंकर पद्धतीने ऑपरेशन लोटस सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार या मुलं पळवणाऱ्या टोळीपासून लपवण्यासाठी गुप्तस्थळी रवाना केल्याचं त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीत महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध
कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. डोंबिवलीत मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आज शेवटच्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसला. त्यामुळे भाजपाचे महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. अलीकडेच शिंदेसेनेतून महेश पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याठिकाणी बिनविरोध निवड होत आहे तिथून उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार माघार का घेतायेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. पॅनेल १८ अ मध्ये भाजपाच्या रेखा चौधरी बिनविरोध आल्या आहेत. २६ क येथून भाजपाच्या आसावरी नवरे यादेखील बिनविरोध आल्या आहेत. शिंदेसेनेचेही अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते.
ठाण्यातही शिंदेसेनेचे खाते उघडले
दरम्यान, कल्याण डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही प्रभाग १८ ब मधून शिंदेसेनेच्या जयश्री रवींद्र फाटक आणि १८ क मधून सुखदा संजय मोरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. याच पॅनेलमध्ये १८ ड मधून शिंदेसेनेचे राम रेपाळे बिनविरोध निवडून आले आहेत. तिथे काँग्रेस उमेदवारासह अपक्षांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग क्रमांक १४ अ मधून शीतल ढमाले बिनविरोध आल्या आहेत आणि प्रभाग क्रमांक १७ अ मधून एकता भोईर यासुद्धा बिनविरोध आल्या असून शिंदेसेनेचे एकूण ५ उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत.
Web Summary : MNS alleges candidates are offered bribes (₹50-60 lakh) to withdraw Panvel election nominations. Candidates are pressured, some unreachable. MVA candidates moved for safety. Ruling alliance wins unopposed in Kalyan-Dombivli, Thane.
Web Summary : मनसे का आरोप है कि पनवेल चुनाव में नामांकन वापस लेने के लिए उम्मीदवारों को रिश्वत (₹50-60 लाख) की पेशकश की जा रही है। उम्मीदवारों पर दबाव, कुछ लापता। सुरक्षा के लिए एमवीए उम्मीदवार स्थानांतरित। कल्याण-डोंबिवली, ठाणे में सत्तारूढ़ गठबंधन निर्विरोध जीता।