बॅकलॉग भरला !

By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T01:23:29+5:302014-07-16T01:23:29+5:30

विदर्भाच्या विकासाचा ‘बॅकलॉग’(अनुशेष) वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही भरून निघाला नाही. मात्र मंगळवारी झालेल्या संततधार आणि तितक्याच दमदार पावसाने जून महिन्यातील पावसाचा

Backlog full! | बॅकलॉग भरला !

बॅकलॉग भरला !

उपराजधानी चिंब : जनजीवन विस्कळीत
नागपूर: विदर्भाच्या विकासाचा ‘बॅकलॉग’(अनुशेष) वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही भरून निघाला नाही. मात्र मंगळवारी झालेल्या संततधार आणि तितक्याच दमदार पावसाने जून महिन्यातील पावसाचा अनुशेष काहीअंशी तरी भरून काढला. सकाळी ८.३० ते सायं.५.३० दरम्यान १०६ मि.मी.पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसात एकूण ११६ मिमी. पाऊस झाला असून तो जुलै महिन्याच्या एकूण सरासरीच्या ३७ टक्के आहे. दरम्यान पुढच्या २४ तासात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदा विदर्भात तो १९ जूनपासून सक्रिय झाला. मात्र विविध शास्त्रीय कारणांमुळे तो बरसतच नव्हता. अखेर त्याने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर बरसतच होता. कधी रिमझिम तर कधी जोरदार बरसणाऱ्या सरीमुळे नागपूरकर चिंब झाले. मुरवता पाऊस असल्याने शेतकरीही सुखावला. महिन्याभरापासून थांबलेल्या पेरण्यांना यामुळे गती येण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तविली आहे. दुष्काळाचे संकट तात्पुरते टळल्याने जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोमवारची सकाळच रिमझिम पावसाने झाली. मुले शाळेत जातांना भिजली व परत येतानाही त्यांनी पावसाचा आनंद घेतला. चाकरमान्यांची अवस्थाही अशीच होती. रेनकोट घालून बाहेर पडूनही कार्यालयात ओले होतच त्यांना जावे लागले. कार्यालय संपल्यावर घरी परत येताना त्यांना चौकाचौकात साचलेल्या पाण्याचा फटका बसला. अनेकांच्या दुचाकी बंद पडल्या. मोठ्या इमारतींच्या तळघरात पाणी शिरले. सखल भागातील वस्त्यांनाही फटका बसला.
जागोजागी ‘जाम’
शासकीय कार्यालये सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. रस्त्यांवरचे पाणी मात्र तुंबलेलेच होते. आपापल्या वाहनांनी कार्यालयांमधून बाहेर पडणाऱ्यांची गर्दी पाहण्यासारखी होती. मोटारगाड्या आणि दुचाकी वाहने एकाच वेळी रस्त्यांवर आल्याने आकाशवाणी चौकातील वाहतुकीला अचानक ब्रेक लागला होता. लगबगीने घरी जाण्याची घाई असूनही चौकात ‘जाम’ झाल्याने वाहनांना पुढे सरकण्यास किमान अर्धा तास लागत होता. हा जाम पाहू जाता पोलीस नियंत्रण कक्ष आणि वाहतूक नियंत्रण शाखेला सूचना देण्यात आली.
सरकारी कार्यालयात गळती
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, रविभवन या सरकारी इमारतींच्या काही भागाला पावसाचा फटका बसला. काही भागात पाणी साचले तर काही भागाला गळतीमुळे ओल आली होती. भर पावसातही सेतू केंद्रात मात्र गर्दी होती. तहसील कार्यालयाच्या परिसरातील गर्दीवरही पावसाचा परिणाम झालेला दिसला नाही (प्रतिनिधी)

Web Title: Backlog full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.