Ayodhya Verdict: Raza Academy appeal, not disrespect for court results | Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन 
Ayodhya Verdict: न्यायालयाच्या निकालाचा अनादर नको, संयम ठेवण्याचे रझा अकादमीचे आवाहन 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांवर बंधनकारक आहे. या निकालाचा अनादर होईल असे कोणतेही कृत्य करु नये व रस्त्यावर उतरुन निषेध, आंदोलन करणे टाळावे व शांतता कायम ठेवावी, व संयम ठेवावा असे आवाहन रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना सईद नुरी यांनी केले आहे. 

आपण लोकशाही देशात राहत असून या देशातील कायदे व न्यायालयाचे निकाल पाळणे सर्वांची जबाबदारी आहे. याबाबत रझा अकादमीने यापूर्वी देखील शांततेचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सर्वांनी वर्तन करावे व समाज स्वास्थ्य बिघडेल असे कोणतेही कृत्य करु नये. अयोध्या निकालावर संयम पाळावा व सामाजिक सौहार्द कायम ठेवावे असे मौलाना नुरी म्हणाले. समाजात तेढ निर्माण होईल व मने दुखावली जातील असे वर्तन करु नये व एक चांगला आदर्श कायम करावा असे ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टात आज अयोध्या निकालावर ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

कित्येक दशकांपासून न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं सुनावला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. 

अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. खास या निकालासाठी न्यायालयानं आजचा दिवस निश्चित केला होता. या प्रकरणी न्या. रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर सविस्तर चर्चा केली होती.
 

Web Title: Ayodhya Verdict: Raza Academy appeal, not disrespect for court results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.