हंगामावर ‘अवकळा’

By Admin | Updated: November 15, 2014 00:07 IST2014-11-15T00:02:15+5:302014-11-15T00:07:16+5:30

अवकाळी पाऊस : गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांना सर्वाधिक फटका

'Avalala' on season | हंगामावर ‘अवकळा’

हंगामावर ‘अवकळा’

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतीतील कामांचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळघरांना बसला असून, त्यांची धुराडी थंडावली आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन जेमतेम पाच-सहा दिवस झाले, तोपर्यंत पावसाने सुरुवात केल्याने कारखान्यांच्या हंगामावरही त्याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे ऊस तोडता येत नाही. तोडलाच तरी शेतात चिखल झाल्याने ऊस वाहतूक करता येत नाही. त्यामुळे साखर कारखान्यांची धुराडी पेटली असली तरी म्हणावी तितका जोर घेतलेला नाही.
या पावसाने जिल्ह्याची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या गूळ व साखर या व्यवसायावरच अवकळा पसरल्यासारखी स्थिती आहे.



गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे अनेक कारखान्यांचे दैनंदिन गाळप पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पाऊस असाच पडत राहिला तर गळीत हंगाम काही दिवसांसाठी बंद ठेवावे लागेल.
साखर कारखान्यांचा हंगाम यंदा लवकर सुरू झाल्याने ऊस लवकर जाईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांचे डोळे कारखान्यांकडे लागले होते; पण पाऊस सुरू असल्याने कारखान्यांच्या हंगामावरही परिणाम झाला आहे. पावसामुळे कारखान्याकडून होणारी ऊस वाहतूक विस्कळीत होते. अशावेळी कारखान्याचे लक्ष केवळ रस्त्याकडील (डांबरी रस्त्याजवळचा ऊस) उसाच्या तोडणीकडे असते; परंतु दैनंदिन गाळप क्षमता पूर्ण करण्यासाठी ऊस अपुरा पडतो. त्यामुळे उसाच्या गाडी अड्ड्यात ५०० ते ६०० टन ऊस येत नाही तोपर्यंत गाळप सुरू होत नाही.
दरम्यान, पाऊस उघडला आणि कडकडीत ऊन पडले तरी पुढे आणखी एक-दोन दिवस ‘घात’ येण्याची वाट पहावी लागते. दिवाळीच्या सुटीनंतर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांनी गती घेतली होती; पण अवकाळी पावसाने गुऱ्हाळघरांना झटका बसला आहे. आधीच विजेचे भारनियमन व मजुरांमुळे गुऱ्हाळमालक हैराण झाले असताना पावसाने ते अधिकच त्रस्त झाले आहेत. या पावसाने जळण भिजत असल्याने गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागत आहेत. गेले दोन दिवस मजूर गुऱ्हाळघरांवर बसून असल्याने त्यांचा पगार गुऱ्हाळमालकांच्या अंगावर बसणार आहे. त्याचबरोबर पावसामुळे शिवारात दलदल झाल्याने उसाची वाहतूकही करता येत नाही. अशा खराब वातावरणात गुऱ्हाळ सुरू करायचे म्हटले तरी गुळाचा
रंग बदलतो. त्यामुळे गुऱ्हाळघर
बंद ठेवणेच शेतकऱ्यांनी पसंत केले.
खरीप काढणीनंतर रिकाम्या शिवारात रब्बी पेरणी करण्यास शेतकरी सज्ज झाला होता; पण पावसामुळे रब्बी पेरणीही खोळंबली आहे. ऊसलागणीही थांबल्या असून, खराब वातावरणाचा फटका भाजीपाल्यालाही बसला आहे. असे वातावरण किडीस पोषक असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे.


पावसामुळे कोल्हापूर बाजार समितीतील गुळाची आवक घटली आहे. त्यामुळे उद्या, शनिवारी गुळाचे सौदे होणार नसल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.


पावसामुळे गुऱ्हाळघरे बंद आहेत. आधीच गुळाला दर नसल्याने हंगाम कसा काढायचा, असा प्रश्न असताना, अवकाळी पावसाने मोठा दणका बसला आहे. खराब हवामानामुळे गाळप केलेल्या गुळाला पाणी सुटण्याची भीती आहे.
- हिंदुराव तोडकर
गुऱ्हाळमालक, वाकरे


अवकाळी पावसाचा परिणाम कारखान्याच्या गळितावर हमखास होतो. दैनंदिन गाळप क्षमता कमी होते आणि उत्पादन खर्च मात्र वाढतो. शेतकरी, ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदार यांवरदेखील परिणाम होतो.
-आर. सी. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक,
राजाराम साखर कारखाना


वैताग आणणारा, निरुत्साही पाऊस..!
कोल्हापूर गांगरले : दिवसभर सूर्यदर्शन नाही
कोल्हापूर : दिवसभर सूर्यदर्शन नाही. पहाटेपासून पावसाची वैताग आणणारी रिपरिप. हवेतला गारठा आणि सगळ्यांतला उत्साह हरवून टाकणारे वातावरण अशी आज, शुक्रवारी दिवसभराची कोल्हापुरातील स्थिती होती. लोकांना हिवाळ्यातील पावसाचा त्रासदायक अनुभव घ्यावा लागला. एरव्ही मनामनांत आशेचे नवे अंकुर फुलविणारा व धरणीमातेची कूस गार करणारा पाऊस आज मात्र लोकांच्या संतापाचे निमित्त ठरला.
खरे तर आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये गुलाबी थंडी सुरू होते. फारशी न बोचणारी... थोड्या पांघरुणाने ऊब येणारी. परंतु यंदा थंडी सुरू झाल्याची नुसतीच चाहुल लागली. एक-दोन दिवस गार वारे जाणवले तेवढे; परंतु पुन्हा ती गायबच झाली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता पळून गेली. थंडी कधी सुरू होणार, अशी प्रतीक्षा असताना दोन दिवसांपासून पावसाची अचानक भुरभुर सुरू झाली. हा पाऊस मुख्यत: रात्री व पहाटे सुरू राहिला. दिवसभर परत ऊन पडत होते; परंतु शुक्रवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेला त्याचा जोर थोडा वाढला. रात्र कधी संपली व दिवस कधी सुरू झाला, हे लोकांना समजलेच नाही; कारण सूर्याचे दर्शन झालेच नाही. सकाळचे वातावरण अंधारलेले होते. त्यामुळे घरातून बाहेर पाय निघत नव्हता. त्याचा परिणाम सरकारी कार्यालयांतील उपस्थितीवर झालाच; तशी शाळांतील हजेरीही रोडावली.
काहीजणांनी रेनकोट घालून नोकरीवर जाणे पसंत केले; परंतु काहींनी त्याचा कंटाळा केला व थांबेल पाऊस म्हणून जे बाहेर पडले, त्यांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावर रेनकोट घातलेले कमी व अंगावर पाऊस झेलत जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. या रिपरिपीमुळे भाजी मंडई ओस पडली. व्यापारावर परिणाम झाला. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. नोकरीवरून घाईगडबडीत घरी परतणाऱ्यांची त्याने चांगलीच कुचंबणा केली. त्यांना भिजत जाण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

निराश करणारे वातावरण
वातावरण मन निराश करणारे होतेच; शिवाय बदलते ऋतुमान आरोग्यावरही परिणाम करणारे. रब्बीच्या पिकांचे नुकसान करणारा पाऊस गूळ व साखर कारखानदारीच्याही अडचणीत भर घालणारा ठरला. पाऊस पडला त्याचे वाईट वाटले नाही; तो पडतही नव्हता व थांबतही नव्हता, म्हणूनच त्याचा लोकांना जास्त वैताग आला. म्हणून तर ‘वैताग आणला या पावसाने!’ अशी प्रतिक्रिया कुठे जाईल तिथे ऐकायला आली.


नवीन रस्त्यांच्या मुहूर्तावर पावसाचे विघ्न
पावसात काम नको : तज्ज्ञांचे म्हणणे
कोल्हापूर : शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. ३९ किलोमीटरचा रखडलेला १०८ कोटींचा नगरोत्थान रस्ते प्रकल्प व अंतर्गत १५० रस्त्यांच्या कामांसाठी ठेकेदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १०५ पैकी १३५ कामांच्या वर्कआॅर्डरचे वाटपही झाले आहे. दिलेल्या वेळेत कामाची सुरुवात व काम पूर्ण करणाऱ्या ठेकेदाराला आर्थिक दंड करण्यात येणार आहे. कधी नव्हे ते प्रशासन रस्त्यांबाबत ‘जागे’ झाले असताना, आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. नवीन रस्त्याला पावसाचे विघ्न असले तरी पावसाळ्यात रस्त्याची कामे करू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
नगरोत्थान योजनेतील ठेकेदार शिवपार्वती कन्स्ट्रक्शन, आर. ई. इन्फ्रा., निर्माण कन्स्ट्रक्शन व व्ही. यू. बी. इंजिनिअरिंग यांना शहरातील रस्त्यांच्या कामांचा ठेका दिलेला आहे. यामध्ये आर. ई. इन्फ्रा.कडून राजारामपुरी मेन रोड येथे फक्त क्रॉसड्रेनचे काम सुरू असून, उर्वरित काम २० नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्यात येईल. शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे जाऊळाचा गणपती ते रंकाळा स्टॅँड रोडचे काम काल, गुरुवारपासून सुरू आहे. गोकुळ हॉटेल ते वाय.पी. पोवारनगर-जवाहरनगर रस्त्याचे काम ठेकेदारांनी सुरू केले आहे. निर्माण कन्स्ट्रक्शन यांचे प्लॅँटचे इन्स्टॉलेशन सुरू असून १ डिसेंबरपासून त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात येणार आहे.
तसेच महापालिका व शासन अनुदानातील विभागीय कार्यालय १ अंतर्गत ३७ वर्क आॅर्डर दिल्या असून, २० नोव्हेंबरपासून सर्व रस्त्यांची कामे सुरू करण्यात येऊन डिसेंबरअखेर सर्व कामे पूर्ण होणार आहेत. विभागीय कार्यालय २ अंतर्गत ३७ कामे असून त्यामध्ये १९ कामांच्या वर्कआॅर्डर दिल्या असून, उर्वरित वर्कआॅर्डर देण्याची कार्यवाही सुरू असून, सदरची सर्व कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विभागीय कार्यालय ४ अंतर्गत ३४ कामांच्या वर्कआॅर्डर दिल्या असून, पाच रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. विभागीय कार्यालय क्र. ४ अंतर्गत ४५ कामे मंजूर असून, एक काम पूर्ण झाले आहे, दोन कामे दोन दिवसांपासून सुरू केली आहेत.

कनिष्ठ अभियंता, उपशहर अभियंता, शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी प्रत्यक्ष कामांवर पाहणीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. कामांवर लक्ष ठेवले जाणार असले तरी पावसाळ्यात रस्त्याची कामे करू नयेत, असा दंडक आहे. प्रशासनाच्या दबावामुळे शहरातील रस्त्यांची कामे पावसातच करण्याची घाई केल्यास पुन्हा रस्ते खराब होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे पावसाचे वातावरण विरल्यानंतरच रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: 'Avalala' on season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.