आॅगस्ट क्रांती दिनी ‘बस देखो-रेल देखो’

By Admin | Updated: June 30, 2014 00:44 IST2014-06-30T00:44:45+5:302014-06-30T00:44:45+5:30

स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

August Revolution Day 'Just Watch-Rail Watch' | आॅगस्ट क्रांती दिनी ‘बस देखो-रेल देखो’

आॅगस्ट क्रांती दिनी ‘बस देखो-रेल देखो’

‘जनमंच’चा पुढाकार : विदर्भवाद्यांचे अभिनव आंदोलन
नागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी मागील काही वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनांतर्गत येत्या आॅगस्ट क्रांती दिनी ९ आॅगस्ट रोजी विदर्भात सर्वत्र ‘बस देखो रेल देखो’ हे आगळेवेगळे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विदर्भवाद्यांच्या विदर्भस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विदर्भ राज्याच्या आंदोलनात सर्वसामान्यांचा सहभाग वाढवून त्याला व्यापक करण्याच्या दृष्टीने एक ठोस कार्यक्रम ठरविण्यासाठी ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने रविवारी संघी सदन काँग्रेसनगर धंतोली येथे विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या विदर्भवादी प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकात वानखडे, प्रा. शरद पाटील, विदर्भ कनेक्टचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विष्णू मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, हरीश इथापे, अजय संघी, विशाल मुत्तेमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आंदोलनाची भूमिका विषद करताना चंद्रकांत वानखेडे यांनी स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणे गरजेचे झाले असल्याचे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, असा निर्धार करण्याचे आवाहन केले.
अ‍ॅड. अनिल किलोर यांनी येत्या ९ आॅगस्ट रोजी उपरोक्त आंदोलनाची घोषणा केली. ‘बस देखो, रेल देखो’ हे एक आगळेवेगळे आंदोलन राहणार आहे. या आंदोलनात आंदोलनकर्ते कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. बसगाड्या रोखणे, रेल्वे रोखणे असा कुठलाही प्रकार होणार नाही. कुठलीही अनुचित कृती न करता केवळ बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर बस व रेल्वे पाहण्यासाठी लोकांना गोळा करायचे आहे. विदर्भातील प्रत्येक ठिकाणी रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर विदर्भवादी मोठ्या संख्येने एकत्र येतील. स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देतील. तसेच भजन, कीर्तन, संगीत या माध्यमातून विदर्भाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतील. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून विदर्भवाद्यांनी सरकारला आपली शक्ती दाखवून द्यायची असल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी साहित्यिकांची भूमिका मांडतांना विदर्भाच्या आंदोलनात त्यांनाही सामावून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. हरीश इथापे यांनी विदर्भाच्या आंदोलनात युवकांनी उडी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यासोबत अनेक प्रतिनिधींनी विदर्भातील मागासलेपणावर व विविध समस्यांवर प्रकाश टाकला.
बैठकीत अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रवीण महाजन, प्रमोद पांडे, विजय विलोकर, गजानन अहमदाबादकर, राम आखरे, राजा आकाश, गजानन कोल्हे, नितीन कारेमोरे, प्रणय पराते, कृष्णराव दाभोळकर, सुनील वंजारी, पंकज वंजारी, प्रकाश इटणकर, संपत रामटेके, नरेश क्षीरसागर, किशोर गुल्हाणे उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: August Revolution Day 'Just Watch-Rail Watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.