कोठडीतील आरोपी महिलेवर फौजदाराचा बळजबरीचा प्रयत्न
By Admin | Updated: August 20, 2016 19:40 IST2016-08-20T01:13:06+5:302016-08-20T19:40:26+5:30
जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहायक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील सतर्क

कोठडीतील आरोपी महिलेवर फौजदाराचा बळजबरीचा प्रयत्न
गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी महिलेवर तेथील सहायक फौजदाराने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील सतर्क महिला पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. ९ आॅगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेबाबत पोलीस विभागाने गुप्तता पाळत त्या फौजदारावर गुन्हा दाखल न करता त्याला १६ आॅगस्टला निलंबित केले.
ग्यानिराम जिभकाटे असे या फौजदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, अशाच एका प्रकरणात यापूर्वीही त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला सेवेत नियमित करण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्याच्या जांभळी येथील जंगलात ३१ जुलैला बोंडगावदेवी येथील एका युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी इतर दोघांसह आरोपी म्हणून मृत युवकाच्या पत्नीलाही ६ आॅगस्टला अटक झाली होती. त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
तिच्या खोलीच्या बाहेर मंजुषा घरडे व घनमारे या पोलीस शिपाई तैनात करण्यात आल्या होत्या. तर, पोलीस ठाण्यात रात्रपाळीत कर्तव्यावर असलेला सहायक फौजदार ग्यानिराम जिभकाटे हा होता. ९ आॅगस्टच्या रात्री जिभकाटे याने त्या महिलेच्या खोलीचे दार वाजवून तिला उठविले. तुझ्याकडे असलेली मुलगी कुणाची, तिला बापाचा दर्जा मी देईन, यासाठी तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, अशी मागणी त्याने केली. त्यानंतर तीच्यावर पोलीस ठाण्यातच बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र ठाण्यातील महिला पोलिसांनी त्याला वेळीच रोखले.
या प्रकाराची माहिती ठाणेदार सुरेश कदम यांना महिला पोलिसांनी दिली. कदम यांनी यासंदर्भात एक अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविला. त्यावरून पोलीस अधीक्षकांनी १६ आॅगस्टला जिभकाटेला निलंबित केले. (प्रतिनिधी)
गुन्हा का दाखल केला नाही?
यासंदर्भात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी झालेल्या प्रकाराला दुजोरा दिला. मात्र यावर अधिक बोलण्यास नकार दिला.