मुंबई - मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा ही मागणी योग्य नाही. सरसकट कुणबी आणि मराठा एकच अशी मागणी केवळ मराठवाड्यापुरती ठेवा, इतर भागात ती कुणाला मान्य नाही असं सांगत जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मराठा समाजाच्या मुंबईतील आंदोलनाबाबत नितेश राणेंनी हे भाष्य केले.
नितेश राणे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारने समिती गठित केली आहे, त्या समितीचे अध्यक्ष विखे पाटील हे आंदोलकांशी संवाद साधतायेत. संवादातून चांगले निष्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. संवाद साधण्यात सरकार मागे हटणार नाही. परंतु ज्यारितीने फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे आणि जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठवाड्यापुरती कुणबी आणि मराठा एकच अशी मागणी करायची असेल तर सरकार त्यावर विचार करेल. परंतु आमच्या कोकणात मराठा समाज, कुणबी समाज यांना कुणी विचारले तर ते सांगतील, आम्ही जिथे आहोत तिथे खुश आणि समाधानी आहोत. सगळ्यांना सरसकट कुणबी करण्याची मागणी ती कोकणाला आणि अन्य महाराष्ट्राला आवडणार नाही. ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण घेण्यापेक्षा आपल्या मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे ना...मग आपल्याला वाद कशाला करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला एकत्रित करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे आपल्याला विसरता कामा नये असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
मराठा आंदोलनाला रोहित पवारांची रसद
दरम्यान, जरांगे पाटील साधा माणूस, प्रामाणिकपणे संघर्ष करतायेत परंतु त्यांचा वापर होतोय. मराठा आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम रोहित पवार करत आहेत. पेट्रोल पंपावर, लग्नाचे लॉज रोहित पवारांनी बुक केले होते. माझ्याकडे पुरावे आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे, त्यापलीकडे अजून काही सवलती देऊ. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून कसं आरक्षण मिळेल? देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा केली तर निश्चित त्यांच्या हाताला काही तरी चांगलेच लागेल आणि ते पुन्हा सुखरूप आपल्या गावाला जावू शकतात असंही नितेश राणे यांनी सांगितले.