Maharashtra ATS Raids: राज्यात घातपाती कारवाया घडवण्याच्या कट रचल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काल मध्यरात्रीपासून धडक कारवाई सुरू केली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यांत साधारण २० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये २० पथकांचा वेढा
सर्वात मोठी कारवाई यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाली. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २० विशेष पथकांनी मध्यरात्री पुसद आणि उमरखेड शहरात एन्ट्री केली. राज्यातील तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना दहशतवादी संघटनांकडे आकर्षित केले जात असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १४ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली असून डझनाहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अहिल्यानगरमध्ये तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
अहिल्यानगर जिल्ह्यातही एटीएसने ७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान काही संशयास्पद ठिकाणांहून तलवारी, आक्षेपार्ह दस्तऐवज, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी ताब्यात घेतले असून, संशयितांच्या आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी सुरू आहे.
अत्यंत गोपनीय मोहीम
या मोहिमेची स्थानिक पोलिसांनाही शेवटच्या क्षणापर्यंत याची कल्पना देण्यात आली नव्हती. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयपीएस दर्जाचे अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातील उरळ परिसरातही काही ठिकाणी पथकांनी तपासणी केल्याचे समजते.
राज्यातील तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली. संशयितांचे काही आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा तपास सुरू आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. "आम्ही अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही रीतसर अटक केलेली नाही. आक्षेपार्ह साहित्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील पावले उचलली जातील," असं एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Maharashtra ATS raided multiple locations, suspecting a plot to radicalize youth. Raids in Yavatmal and Ahilyanagar led to detentions and seizure of weapons, documents. Investigation ongoing.
Web Summary : महाराष्ट्र एटीएस ने युवाओं को कट्टरपंथी बनाने की साजिश के संदेह में कई स्थानों पर छापे मारे। यवतमाल और अहिल्यानगर में छापे में हथियार, दस्तावेज जब्त, हिरासत में। जांच जारी।