महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयानंतर, आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर आता राज्यात 'देवेंद्र 3.0'ला सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य समारंभ पार पडला. यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले.
यावेळी, २०२४ नंतरच्या महाराष्ट्राकडे कसे पाहता? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "मला असे वाटते की, महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करत आहे, मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण योग्य कसे करता येईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सुशीलकुमार शिंदेजी, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असती, अशा सर्व प्रमुख लोकांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले. त्यांतील प्रत्येकाने माझे अभिनंदन केले, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणांनी ती लोकं येऊ शकली नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या."
फडणवीस पुढे म्हणाले, "मला वाटते की महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे अंतर आहे, ते हेच आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये पाहतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की, हिंदीमध्ये ज्याला "खून के प्यासे" म्हणतात, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल."
यावेळी, "एक तर तुम्ही राहाल नाही तर मी", असे म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "नाही नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की, राजकारणात सगळेच राहतात, तेही (उद्धव ठाकरे) राहतील आणि मीही राहील. आम्ही सगळेच राहणार आहोत."
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता. ते म्हणाले होते, "कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितले की, कसे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळे सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन."