Asylum seeker leads BJP, Shiv Sena accepts revolt | Maharashtra Election: आक्रमक भाजपला आघाडी शरण, शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण

Maharashtra Election: आक्रमक भाजपला आघाडी शरण, शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख, आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख, जलसंधारमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या दोन मंत्र्यांविरोधात आघाडीला सक्षम उमेदवार देण्यात अपयश आले आहे. दुसरीकडे शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजप नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेने सेना उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. पंढरपूरच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी आहे.


जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजप पाच जागांवर लढत आहे. यातील दोन जागा रयत क्रांती या मित्र पक्षाला दिल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही उमेदवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत. शिवसेना सहा जागांवर लढत असून चार जागांवर बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी आठ तर काँग्रेस चार जागांवर लढत आहे.


मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांच्यात सामना आहे. क्षीरसागर यांच्या विरोधातील बंडखोरांना भाजपने बळ दिल्याची चर्चा आहे. अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे विरुद्ध भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांच्यात काट्याची लढत आहे. माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि राष्टÑवादीचे उत्तम जानकर यांच्यात लढत होत असली तरी इथे मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा पणाला आहे. माढ्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे विरुद्ध शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्यात लढत आहे. माढ्यात दरवेळी तिरंगी किंवा चौरंगी लढत व्हायची. आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांच्या मतदानाची बेरीज जादा असायची. यंदा एकास-एक लढतीचा निकाल काय असेल याबद्दल उत्सुकता आहे. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विरुद्ध शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातील सामना रंगतदार ठरतोय. डॉ. अनिकेत हे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. पूर्वी देशमुखांसोबत असलेले उद्योजक भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे लोक आता शहाजीबापूंच्या बाजूने आले आहेत. करमाळ््यात सेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात नारायण पाटील, संजय शिंदे मैदानात आहेत. महायुतीतील गोंधळामुळे अपक्ष संजय शिंदे यांना आशा आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस, पंढरपूर, माढ्यात महायुतीसाठी तर करमाळ्यात अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम सलग ११ व्यांदा रिंगणात आहेत. ८५ वर्षीय सुधाकर परिचारक यांना भाजपने मित्रपक्षातून उमेदवारी दिली आहे. शेकापचा डॉ. अनिकेत देशमुख हा तरुण चेहरा पहिल्यांदा रिंगणात आहे.
लोकसभेत वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचा प्रभाव होता. शहर उत्तर आणि शहर मध्य वगळता इतर मतदारसंघात प्रभाव दिसत नाही.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) सोलापुरातील प्रलंबित विमानसेवा, बेरोजगारी, अनियमित पाणीपुरवठा
२) कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह इतर प्रलंबित सिंचन प्रकल्प
३) सर्वच साखर कारखान्यांकडे थकलेली उसाची बिले
४) भाजपकडून शहरी भागात कलम ३७०
तर ग्रामीण भागात
वीज, रस्ते यावर भर

रंगतदार लढती
शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे दिलीप माने यांच्यासह इतर तीन उमेदवार रिंगणात आहेत. सेनेत बंडखोरी झाल्यामुळे महायुतीला परिश्रम घ्यावे लागत आहेत. काँग्रेसपुढे एमआयएम आणि माकपची डोकेदुखी कायम आहे.
पंढरपुरात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके विरुद्ध भाजप-रयतचे सुधाकर परिचारक यांच्यात घमासान आहे. भालकेंविरुद्ध काँग्रेसने तर परिचारक यांच्याविरुद्ध समाधान आवताडे यांनी बंडेखारी केली आहे.
बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल विरुद्ध अपक्ष राजेंद्र राऊत यांच्यात चुरशीचा सामना आहे. राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांची उमेदवारी प्रबळ ठरली आहे. राष्ट्रवादीचे मतविभाजन कोणाच्या फायद्याचे ठरते याकडे लक्ष आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Asylum seeker leads BJP, Shiv Sena accepts revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.