शिपाई महिलेची मुलगी बनली सहायक अभियंता

By Admin | Updated: February 2, 2015 23:56 IST2015-02-02T23:12:28+5:302015-02-02T23:56:08+5:30

जलसंपदा विभागात निवड : रामानंदनगरच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवतीचे अभिमानास्पद यश

The assistant engineer, who became the girl's daughter | शिपाई महिलेची मुलगी बनली सहायक अभियंता

शिपाई महिलेची मुलगी बनली सहायक अभियंता

किर्लोस्करवाडी : रामानंदनगर (ता. पलूस) येथील सुप्रिया सुभाष सोरटे (मूळ गाव बामणी, ता. खानापूर) हिची स्पर्धा परीक्षेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता वर्ग २ म्हणून निवड झाली. सध्या नांदेड जिल्ह्यातील वसम येथे सहायक अभियंता म्हणून ती नुकतीच रुजू झाली.तिची आई आशाताई सोरटे या पुणदी (ता. पलूस) येथील यशवंत काशीद शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून सेवेत आहेत, तर वडील सुभाष सोरटे हे कुंडल-पलूस परिसरात द्राक्षबागांचे मांडव उभारणीचे काम रोजंदारीवर करतात. सुप्रियाच्या आईच्या नोकरीनिमित्त हे कुटुंबीय रामानंदनगर येथे भाड्याने राहतात. येथेच सुप्रियाने जि. प. शाळा नं. ३ मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात माध्यमिक शिक्षण, तर स्वामी रामानंद विद्यालयात अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर सांगली येथील वालचंद कॉलेजमधून बी. ई. सिव्हिल ही पदवी जून २0१३ मध्ये ८0 टक्के गुणांसह संपादन केली.जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य आणि आई-वडील यांच्या आशीर्वादामुळेच हे यश मी संपादन करु शकले, असे पाणावलेल्या डोळ्यांनी सुप्रिया सांगत होती. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथे धु्रव कन्सल्टन्सीमध्ये एक वर्ष नोकरी केली. जलसंपदा विभागात सहायक अभियंता वर्ग २ च्या स्पर्धा परीक्षेची माहिती अभियंता अनिल लोंढे यांनी दिली. परिक्षेसाठी लागणारी पुस्तकेही त्यांनीच दिली. फक्त तीन महिनेच अभ्यास केला. आॅगस्ट २0१३ मध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्च २0१४ ला निवड झाली आणि आता मी कामावर रुजू झाले. एस. सी. प्रवर्गात असताना देखील मी खुल्या गटामधून निवडले गेले, असे ती ताठ मानेने सांगत होती.माझे आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून, यापुढेही स्पर्धा परीक्षेद्वारे आयएएस करण्याची इच्छा आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून मी सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा करणार आहे. या सेवेतून सदैव समाजकार्य करण्याची इच्छा सुप्रिया यांनी व्यक्त केली.
सुप्रियाचे आई-वडील व भाऊ यांच्या चेहऱ्यावरूनदेखील सुप्रियाचे यश ओसंडून वाहताना दिसत होते. जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम केल्याने यश प्राप्त होते. एका सामान्य कुटुंबातील व शिपाई आईची मुलगीदेखील सहाय्यक अभियंता बनली, याचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाली. (वार्ताहर)


या यशामध्ये माझे आई-वडील, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विमल वाघमारे व अभियंता अनिल लोंढे व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन देखील अधिकारी बनता येते, हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. या सेवेतून सदैव समाजकार्य करण्याची इच्छा आहे.
- सुप्रिया सोरटे
सहाय्यक अभियंता, वर्ग २
 

Web Title: The assistant engineer, who became the girl's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.