Assembly Winter Session: "आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही", मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:27 IST2022-12-30T17:26:57+5:302022-12-30T17:27:06+5:30
Assembly Winter Session: ''प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे लिंबांची भाषा करायला लागले.''

Assembly Winter Session: "आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही", मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. ''प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांचा कायम विरोध केला. त्याच प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे लिंबांची भाषा करायला लागले,'' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
आम्ही गोविंदबागेत गेलो नाही
रेशीमबागेत जाण्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, ''आम्ही रेशीमबागेत गेलो त्यावरही टीका झाली. आम्हाला रेशमाचा किडा म्हणाले. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतो. आम्हाला बोलणाऱ्यांनी एवढं लक्षात ठेवावं आम्ही रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत नाही. हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा. जे काहीही न करता घरात बसून राहतात ते आम्हला शिकवतात,'' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
लिंबूटिंबूची भाषा करता...
शिंदे पुढे म्हणाले, ''प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांचा कायम विरोध केला. प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे लिंबांची भाषा करायला लागले. मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो आधी काय काय आहे ते बघा म्हटले. आम्हाला पाटीभर लिंबं सापडली तिकडे. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली. मोत्याच्या पोटी गारगोडी....मला पुढे बोलायची गरज नाही,'' असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.
बाळासाहेब आम्हाला पितृतुल्यच
''राष्ट्रवादीची शिवसेना..जयंत पाटील बरोबर बोलत होते. आम्ही पण तेच सांगत होतो, त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. बाप चोरला म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पितृतुल्यच आहेत. विचार चोरले म्हणता? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकले ते आमच्याविरोधात कसं बोलतात? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,'' अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.