इच्छुकांनी घेतली ज्योतिषांकडे धाव
By Admin | Updated: January 21, 2017 01:34 IST2017-01-21T01:34:58+5:302017-01-21T01:34:58+5:30
महापालिका निवडणुकीमुळे ज्योतिषांकडे जाणारांची गर्दी वाढली आहे

इच्छुकांनी घेतली ज्योतिषांकडे धाव
पिंपरी : महापालिका निवडणुकीमुळे ज्योतिषांकडे जाणारांची गर्दी वाढली आहे. काही जणांनी ज्योतिष्यांना परगावाहून निमंत्रित केले आहे. त्यांच्याकडून इच्छुकांना वेगवेगळ््या प्रकारची शांती करण्यासाठी सांगण्यात येत आहे. तसेच शहर परिसरात भोंदूबाबांचे प्रस्थ वाढले असल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने पौष महिन्यातच निवडणुका जाहीर केल्या आहेत. हा महिना म्हणजे चांगल्या कामाचा प्रारंभ करण्यास अशुभ मानला जातो. त्यामुळे इच्छा असूनही काही इच्छुक प्रत्यक्ष प्रचार करीत नाहीत. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी प्रचाराबरोबर अंधश्रद्धाही पाळल्या जात आहेत. त्यासाठी ज्योतिषी आणि भोंदूबाबाना मागणी वाढली आहे. भोंदूबाबा सांगतील ते खरे असे समजून इच्छुक त्यांच्यासाठी वाटेल ते खर्च करत आहेत. या काळात इच्छुकांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या गंड्यांसह बोटातील अंगठ्याही वाढल्या आहेत.
कोणता भविष्यवाला व्यवस्थित माहिती सांगेल, याची चाचपणी केली जात आहे. विरोधक तगडा असल्यास काय करता येईल, काय निर्णय घ्यावा, याबाबतही माहिती घेतली जात आहे. देवदर्शनासह बाबांकडून जे सांगितले जाईल, त्या प्रकारच्या शांती व पूजा केल्या जात आहेत. प्रचारासाठी किती वाजता घराबाहेर पडायचे, अर्ज कोणत्या दिवशी भरायचा, उमेदवारी मिळण्यासाठी काय करायला हवे, या बाबी इच्छुक उमेदवार भविष्यवाल्याला विचारुन करीत आहे. यामुळे सध्या अनेक इच्छुक भविष्यवाल्याच्या दारात दिसत आहेत. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांनी
जोरदार तयारी केली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक केली जात आहे. अनेक इच्छुक शहरापासून दूर अंतरावरील बाबांकडेही जात आहे. (प्रतिनिधी)
>खड्याच्या अंगठीला मागणी
जन्मपत्रिका सांगून इच्छुकांना ठराविक खड्यांची अंगठी घालण्यास सांगण्यात येत आहे. त्याच्या किंमत दहा हजारांपासून सुरू होत आहे. तरीही एका इच्छुकाच्या हातात पाच ते सहा अंगठ्या दिसत आहेत. काही भोंदूबाबा इच्छुकांना अमूक एका दिशेकडे पाय पसरून झोपा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. त्यातून तुम्ही विजयी व्हाल, असे सांगत आहेत.
मुहूर्तावर भरणार अर्ज
निवडणुकीत कसलीही अडचण येऊ नये, निवडणूक प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज
भरताना दिवस व वेळ कोणती असावी, प्रचाराला कोणत्या वेळेत जावे, आदींची माहिती घेतली जात आहे. भविष्य सांगणारयांकडे इच्छुकांचीच गर्दी दिसून येत आहे.