आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल रात्री झालेल्या सामन्याला देशभरातून तीव्र विरोध झाला होता. हा सामना रद्द व्हावा यासाठी देशभरात तीव्र आंदोलनंही झाली होती. तसेच या सामना खेळण्यासाठी भारतीय संघाला परवानगी दिल्याने बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका होत होती. या परिस्थितीत चौफेर दबावाखाली खेळताना भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर आता कालपासून टीकेचा सामना करत असलेल्या केंद्रातील सत्ताधारी भाजपाने विरोधकांना डिवचलं आहे.
भाजपाचे नेते आणि महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयावरून विरोधकांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ही खरी पहलगाम हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली! काल पाकिस्तानला किक्रेटच्या मैदानात सर्व बाजूने चारीमुंड्या चीत करून विजयी होत पाकिस्तान खेळाडूंची दखलही न घेता भारतीय संघ पुढे निघून गेला. ही खरी पहलगाम शहिदांना वाहिलेली श्रद्धांजली होती. हेच खरे अस्सल वाघ, अशा शब्दात उपाध्ये यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं.
उपाध्ये पुढे म्हणाले की, पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनात रमलेले उद्धव ठाकरे, किंवा पाकिस्तानची भाषा बोलणारे राहुल गांधी यांच्यासारखे भारतीय नेते हे कागदी वाघ आहेत. सतत पराभवाची कारणे शोधायची यांना सवय आहे. यांना ना लढायचं माहिती आहे ना विजयाची भाषा यांना कधी कळली आहे. भारतीय सैन्याने ॲापरेशन सिंदूर यशस्वी करीत पाकिस्तानला धडा शिकवलाच पण आता क्रिकेटच्या मैदानावरही भारतीय संघाने हेच सिद्ध केले.यह नया भारत है… यह लडनेसे डरता नही है.. लडता है, और जीतता भी है, असा इशाराही केशव उपाध्ये यांनी यावेळी दिला.