"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 09:01 PM2024-02-28T21:01:15+5:302024-02-28T21:02:46+5:30

महाविकास आघाडीच्या काळात काय घडलं याचा पाढा वाचत, 'तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये', असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar slams Opposition Ambadas Danve regarding law and order pollution Mumbai police | "विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

"विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा"; भाजपा आमदार आशिष शेलार यांचा पलटवार

Ashish Shelar slams Mahavikas Aghadi: "शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा करणाऱ्या तत्कालीन आघाडी सरकारने आपल्या काळात काय केले? याचे उत्तर आधी द्यावे, मगच आम्हाला प्रश्न विचारावे. आज महायुती सरकारवर जे विरोधक बोलत आहेत, त्यांनी आणलेला प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत", असा पलटवार मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाने विधानसभेत आज 293 नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर युती सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली होती. त्याला शेलारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

"हा प्रस्ताव म्हणजे आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पत्रकार निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा विषय काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण विचारतेय? ज्यांनी पत्रकार राहुल कुलकर्णी याने ठाकरे सरकार विरोधात बातमी दिली म्हणून त्याला कोरोना काळात फरफटत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणले ते आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत?  निखिल वागळे यांच्या बाबतीत जे घडले त्याची तक्रार दाखल झाली आहे पोलीस पुढील कारवाई करतील. पण एक निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला घरात घुसून डोळा  फोडला, केतकी चितळे हिच्यावर कुणाच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला? त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारु नये. मुंबईत ज्यांनी बिल्डरांना 12 हजार कोटी रुपयांची प्रिमियम माफी दिली त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली तेच उबाठा आज मुंबईत प्रदुषण वाढले म्हणून बोंबाबोंब करीत आहेत", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आमदार  प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्री कौनसी माँ की चिंता करते है, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, देशामध्ये ७ कोटी अशा माता होत्या, ज्यांच्या डोळ्यांतून चुलीवर जेवण केल्याने अश्रू येत होते, त्या मातांना उज्ज्वला योजनेचा लाभ मा. पंतप्रधानांनी पोहचवला. १२ कोटी अशा माता आहेत ज्यांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते, त्या माता भगिनींच्या घरात शौचालय बांधले. गरीब माता भगिनींना ६० वर्ष सत्तेत असलेलं काँग्रेस सरकार बँकेमध्ये प्रवेश, साधं चेकबुक देऊ शकलं नाही. यांच्या सरकारमध्ये फक्त ११ कोटी मातांचे बँक अकाऊंट होते, पण फक्त २०१४ ते २०१९ या काळात ३५ कोटी मातांचे जनधन खाते बनले आहे. माझ्या मातांच्या घरापर्यंत जल-नल योजनेद्वारे  पिण्याच्या पाण्याचे नळ पोहचले आहेत. ३२ कोटी आमच्या मातांचा विमा काढून प्रिमीयमचे हफ्ते न भरता त्यांना फायदा मिळतोय. आमच्या गावातील प्रत्येक मातेपर्यंत डिजीटल इंडियाचे नेटवर्क पोहचवले जाते. त्यामुळे कोणी आमची माता काढू नये. स्वतःची आई गेल्यावर तिचा अंत्यविधी केल्यानंतर एका तासामध्ये जो मनुष्य देशाच्या कामासाठी लागतो, त्यांच्या माता काढणे आपल्याला शोभनीय नाही, असे जोरदार उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का?

सरकार कोणतेही असो कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना अन्यायच का होतो? असा थेट सवाल शेलार यांनी केला. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे दुजाभाव करण्याची गरज नाही. पण कुठलेही सरकार असले तरी आमच्या कोकणातील शेतकऱ्यांवर अन्यायच होतो. नैसर्गिक आपत्ती, रोग राई, आंब्याचे नुकसान झालेल्या आमच्या कोकणातील बागायतदारांना, विशेषतः आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नाही. कोकणातील १० वर्षांचा रिव्ह्यू घ्यावा आणि त्यानंतक कोकणातील बागायतदारांसाठी एक सर्वंकष योजना द्यावी अशी मागणी केली आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा करताना केली.

Web Title: Ashish Shelar slams Opposition Ambadas Danve regarding law and order pollution Mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.