भानुदास पऱ्हाड
आळंदी (शेलपिंपळगाव ) : "बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात माऊलींची वारी फुलांनी सजविलेल्या बसने पंढरीला रवाना झाली. आळंदीतून निघालेला वारीसोहळा विनाथांबा पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटणमार्गे सायंकाळी सहाच्या दरम्यान वाखरीत दाखल होईल. तत्पूर्वी, पहाटे पाचला माऊलींच्या चलपादुकांची पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी ७ ते ९ ह.भ.प. धोंडोपंत बाबा अत्रेफड (पंढरपूर) यांचे कीर्तन झाले. दुपारी बाराला 'श्री'ना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यांनतर एकच्या सुमारास निवडक वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चलपादुका आजोळघरातून सजविलेल्या बसमध्ये विराजमान करण्यात आल्या.
......................................
हे गेले वारीला... पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक एकमधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिंडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनमधील श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनमधील भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई हे वीस मानकरी माउलींच्या पादुकांसोबत एसटीने पंढरपूरला गेले आहेत.