काष्ठशिल्प कला हीच ‘निंबा’ची ओळख!
By Admin | Updated: July 31, 2016 04:15 IST2016-07-31T04:15:16+5:302016-07-31T04:15:16+5:30
प्रत्येकाकडे काही ना काही उपजत कलागुण असतात.

काष्ठशिल्प कला हीच ‘निंबा’ची ओळख!
विजय मानकर,
सालेकसा (गोंदिया)- प्रत्येकाकडे काही ना काही उपजत कलागुण असतात. त्याचा वापर रोजगारासाठी करून त्यातून स्वावलंबी जीवन जगता येते, याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निंबा गावात येतो. येथील अनेक युवकांनी काष्ठशिल्पकला आत्मसात करून आणि त्यातून रोजगार मिळवला आहे.
राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा तालुका असलेला सालेकसा तसा मागास, दुर्गम, जंगलव्याप्त आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका मुख्यालयापासून ७ किलोमीटर अंतरावरील निंबा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता काष्ठशिल्पकलेसाठी प्रसिद्ध होत आहे. या गावातील कलाप्रिय बेरोजगार युवकांनी तयार केलेली काष्ठशिल्पं आता राज्याच्या सीमा पार करून दुसऱ्या राज्यातही पोहोचत आहेत.
साधारण १६-१७ वर्षापूर्वी या गावात काष्ठशिल्पाचा गंध कुणाला नव्हता. पण गावातील रामलाल चव्हाण यांच्यामुळे ही कला गावात आली आणि रुजली. रामलाल हे एम.कॉम. प्रथम वर्षापर्यंत शिकलेले गावातील एकमेव गृहस्थ. १९९२ ते १९९९ या दरम्यान ते अलाहाबादच्या एका फायनान्स कंपनीसाठी गोंदियात शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना कंपनीने गुंतवणूकदारांचा गंडा घालून पोबारा केला. त्यामुळे रामलालने थेट आपले गाव निंबा गाठले आणि आपला मुक्काम गावाजवळील शेतात ठोकला. शेतालाच लागून जंगल जंगलात ते भटकंती करू लागले. त्यांना बांबूचे व झाडांचे विविध प्रकारचे ओबडधोबड आकाराचे निरूपयोगी खोड, मूळ नजरेस पडले. रामलाल यांनी ते गोळा करणे सुरू केले. त्यापासून टेबल लॅम्प, साप, विविध प्रकारचे शो-पीस तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू या वस्तूंना मोठी मागणी येऊ लागली.
आता प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून काष्ठ शिल्पकारांची फौज तयार करु न त्यांना स्वावलंबी करण्यासाठी रामलाल पुढाकार घेत आहेत.
>दिल्ली-मुंबईत प्रदर्शन
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रामलाल यांच्या काष्ठशिल्पांना प्रदर्शनाची संधी देण्यात आली. त्यामुळे या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रगती मैदान दिल्ली, मुंबई येथील सरस प्रदर्शन, पुणे, नागपूर, रायपूर आदी शहरांत भरलेल्या प्रदर्शनात निंबा गावात तयार झालेल्या वस्तूंची विक्री झाली.
>एव्हाना ही काष्ठशिल्पकला रामलालच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली. अनेकांची पावलं काष्ठशिल्पाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी निंब्याकडे वळू लागली. रामलाल यांनी आपल्या अंगी असलेली ही कला स्वत:पुरती मर्यादित न ठेवता गावातील अनेक युवकांना स्वत:च्या घरीच प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यातून अनेक युवक या कलेत तरबेज झाले.