आमदार रमेश कदम यांचे अटकनाट्य
By Admin | Updated: July 5, 2015 01:49 IST2015-07-05T01:49:19+5:302015-07-05T01:49:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर नेलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले.

आमदार रमेश कदम यांचे अटकनाट्य
मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर नेलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत आ. कदम यांच्यासह १२ पोलीस जखमी झाले. याप्रकरणी कदम यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
प्रत्यक्षात ‘अटक करणार नाही’, असे पोलिसांनी लिहून दिलेले असतानाही आ. कदम यांनी हे अटकनाट्य घडवून आणले.
शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हायवे पुलाखालील रस्ता अरुंद असल्याने नागरिकांच्या सूचनेनुसार २८ जून रोजी रमेश कदम यांनी तेथील जाळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढली़ मोहोळ पोलीस ठाण्यात आ़ कदम यांच्यासह तिघांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़
आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगत अटक करून घेण्यासाठी शनिवारी आ़ कदम हजारो कार्यकर्त्यांसह मोर्चाने मोहोळ पोलीस ठाण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावाला बाहेरच अडविले. मात्र कदम यांना ताब्यात घेतल्यावर जमावाने पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांनी लाठी चार्ज केला, तर जमावानेही जोरदार दगडफेक केली.
जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळेच हा प्रकार घडला आहे़ नागरिकांच्या सोयीसाठी काढलेल्या जाळीचा गुन्हा कसा होऊ शकतो? येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडून या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे़
- रमेश कदम, आमदार
तुम्हाला अटक करणार नाही, असे पत्र आम्ही आ़ रमेश कदम यांना दिले होते़ तरीही अटक करून घेण्यासाठी ते मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर आले़ त्यामुळेच हा प्रकार घडला़
- दिलीप चौगुले,
पोलीस उपअधीक्षक