'खंबाटातील कामगारांच्या दुरवस्थेला सेनाच जबाबदार'
By Admin | Updated: January 7, 2017 06:13 IST2017-01-07T06:13:15+5:302017-01-07T06:13:15+5:30
मराठी कामगारांना रस्त्यावर आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी शुक्रवारी केला.

'खंबाटातील कामगारांच्या दुरवस्थेला सेनाच जबाबदार'
मुंबई : खंबाटा प्रकरणात सध्या मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्याचे खासदार विनायक राऊत यांनीच खंबाटा एव्हिएशनमधील मराठी कामगारांना रस्त्यावर आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी शुक्रवारी केला.
मुंबई विमानतळावर ग्राउंड हॅण्डलिंग एजंट म्हणून काम करणारी खंबाटा एव्हिएशन ही कंपनी आॅगस्ट २०१६ मध्ये तडकाफडकी बंद करण्यात आली. सुमारे २१०० कामगारांचा दहा महिन्यांचा पगार, भविष्यनिर्वाह निधी आणि अन्य भत्ते मिळून तब्बल ४०० कोटींहून अधिक रक्कम कंपनीने थकविली आहे. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी विनायक राऊत आणि शिवसेनेने या कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप पावसकर यांनी केला. खंबाटातील कामगारांची मान्यताप्राप्त संघटना शिवसेनेचीच असून तिचा कारभार विनायक राऊतांकडे होता. आपल्याच कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून खंबाटाच्या विक्रीसाठी राऊत यांनी प्रयत्न करणे संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पावसकर यांनी केली. बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस (बीडब्ल्यूएफएस) या कंपनीने मुंबई विमानतळावरील ग्राउंड हॅण्डलिंगचे काम घेतले. या कंपनीस खंबाटा स्वत:ची वाहने आणि उपकरणे वापरण्यास देते. खंबाटातील कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविणारी बीडब्ल्यूएफएस खंबाटाची वाहने आणि उपकरणे वापरत असल्याची बाब शिवसेनेला दिसली नाही का, याचा खुलासा व्हायला हवा, असे पावसकर म्हणाले. (प्रतिनिधी)
>कामगारांवर अन्याय
दरम्यान, मुंबई विमानतळावरील खंबाटाची २०८ वाहने जप्त करण्यात आली. बीडब्ल्यूएफएसने स्वत:चा लोगो डकवून ही वाहने वापरात आणली होती. याशिवाय, बीडब्ल्यूएफएसची पाच उपकरणे लिलावात काढण्याचा तसेच खंबाटाने जीव्हीकेला दिलेले
४० कोटी कामगार आयुक्तांमार्फत कामगारांकडे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत कामगारांवरील अन्यायाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता.