बीडमधील दहशतीवरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेले आरोप प्रत्यारोपांचे प्रकार आज झालेल्या जिल्हा नियोजन सभेतही दिसून आले. पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यात बाचाबाची झाली. बीडची बदनामी करत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यावरून हे झाल्याचे सोनावणेंनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. आज त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिली नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि पहिल्यांदाच शिस्तीत बैठक पार पडल्याचा दावा सोनावणे यांनी केला. तसेच बैठकीत अनुपालन झाले, मागचा आराखडा झाला, अजित पवारांनी सर्व आढावा घेतला. बीड जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अनेक कामांना मान्यता देण्यात आल्याचा आरोप सोनावणे यांनी केला.
सीईओंनी आराखड्यात नसणाऱ्या कामांना मान्यता दिल्या आहेत. बैठकीत रेल्वे संदर्भात प्रस्ताव आपण मांडला आहे. तसेच विमानतळासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी चर्चा करत असताना दहशतीच्या मुद्द्यावरुन थोडी बाचाबाची झाली. बीडची बदनामी करू नका, असे मुद्दे बैठकीत आले. यावर आम्ही बीडची बदनामी कोण करत आहे? जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आम्ही जनतेसमोर आणत आहोत, असे सांगितले. कोणीही दोषी आढळल्यास कारवाई करणार, असे अजित पवारांनी म्हटल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
धस काय म्हणाले...बाचाबाची किरकोळ विषय आहे, ती होतच असते. जिल्ह्यात ७३ कोटी रुपये बोगस उचलले असल्याचे मी जाहीर केले आहे त्याची आता लेखी तक्रार करणार आहे. बोगस कामांची बिलं, पैसे उचलण्यात आले होते हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर अजित पवारांनी लेखी पत्र द्या असं सांगितले आहे.
गुद्द्यांचे भांडण नाही...
परळीतील काही पोलीस चुकीचे वागलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या सुरु कराव्यात. काल रात्री अजित पवारांच्या पीएला पुराव्याचा पेनड्राईव्ह दिला आहे. पोलिसांनी राजीनामे देऊन वाळूचे धंदे सुरु करावेत. नियोजनच्या बैठकीत गुद्द्याचं नाही मुद्द्याचं भांडण झाले, असे धस म्हणाले.