आता आम्हीही ओबीसीच आहोत ना... मग आम्हाला कशाला धक्का लावतो? का तूच खातो सगळं रेटून? अशा शब्दात आज मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँगेरस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ यांच्या ओबीसी डीएनए आणि भाजप विधानावरून ते बोलत होते. एवढेच नाही, आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.यावेळी, छगन भुजबळ म्हणालेत की, ओबीसी भाजपचा डीएनए आहे. या डीएनएला धक्का लागायला नको. याची काळजी भाजपने घ्यायला हवी? असे विचारले असता, जरांगे म्हणाले, "कुठे लागलाय मग? आम्हीही ओबीसच आहोत ना मग... आम्ही कोण आहोत मग? ओबीसीच्या डीएनएला धक्का लागायला नको ना...? मग आता आम्हीही ओबीसीच आहोत ना... मग आम्हाला कशाला धक्का लावतो? का तूच खातो सगळं रेटून?"तुम्ही सांगत आहात की, जीआरमध्ये काही तृटी असेल, तर त्यात बदल केला जाईल. पण जीआरमध्ये खरंच तृटी राहिल्या आहेत, असे वाटते का? कारण बरेच अभ्यास प्रश्न उपस्थित करत आहेत. असे विचारले असता, जरांगे म्हणाले, "जीआर निघाल्यानंतरच फार अभ्यासक झाले बाबा. महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. जीआरच्या आधी काही सापडत नव्हतं, अभ्यासक नाही, काही नाही. पण ठीक आहे ना, भावना आहेत, समाजाचे लोक आहोत, त्यांची भावना आहे ना. काय गरज आहे त्यांना विरोध करण्याची? त्यांना विरोध करायचा असेल, तर करू द्या ना... आम्ही नाही करत त्यांना विरोध. त्यात काय सुधारणा करायची सांगितली आहे...
यावर पुन्हा तृटी आहेत, हे मान्य आहे का? असा प्रश्न केला असता, जरांगे म्हणले, "मला ज्या गोष्टीवर आक्षेप वाटला, ते मी काढून टाकले. त्यातले दोन शब्द आणि खालच्या भागातील 4 शब्द. मी जागेवरच सांगिलले की, हे योग्य नाही. मी जीआरला हात लावणार नाही. त्यावर ते म्हणाले पुन्हा वेळ द्यावा लागेल. मी म्हणालो वेळ घ्या नाही तर काही करा. मी लोकांनाही सांगितले, जोवर जीआर हातात येत नाही, तोवर उपोषण सोडायचे नाही. त्यावर पुन्हा दीड तास गेला. ते दोन शब्द काढले, पुन्हा चार आले. यावर, तेथे बसलेल्या अभ्यासकांनी आक्षेप घेतला. यानंतर त्यांनी थोडं समजून सांगितल्यानंतर, आम्ही म्हणालो ओके. असेलच काही तर दुरुस्त करायचे म्हणालोना राव.
यावर, तृटी असतील असे वाटते का तुम्हाला? असे विचारले असता जरांगे म्हणाले, आहे ना... तर कर... आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो.
नेमके काय म्हणाले होते भुजबळ? -एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना भुजबळ म्हणाले होते, "भाजपचे सर्व नेते म्हणत असतात की, ओबीसी आमचा डीएनए आहे. आता त्यांनी ध्यानात ठेवायला हवे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये. ही त्यांनी काळजी घ्यायला हवी."