'दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?' असा सवाल करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितेल्या माहितीवरच शंका व्यक्त केली. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. 'विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे', असे बावनकुळे म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिंदू टार्गेट केलं जातं हे सिद्ध झालंय -बावनकुळे
"विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे", असे बावनकुळेंनी म्हटलं आहे.
वाचा >>एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या
बावनकुळेंनी पुढे म्हटलं आहे, "मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत 'दहशतवादाला जात-धर्म नसतो' असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", असा संतप्त सवाल बावनकुळे यांनी केली आहे.
'दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न'
"विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे", अशी टीका बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या विधानावर बोलताना केली.
"देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही", असा इशारा बावनकुळेंनी काँग्रेसला दिला.
मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका
'ज्यांच्यासमोर दहशतवाद्यांनी मारलं, त्या नातेवाईकंनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावं की काय मला समजत नाहीये', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केली आहे.