मुंबई - विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. ७ आणि ८ डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे. त्यात निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेतील. तत्पूर्वी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कालिदास कोळंबकर हे सलग ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. हंगामी अध्यक्ष म्हणून दुपारी १ वाजता कालिदास कोळंबकर हे शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या एकूण २८८ आमदारांना शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजपाचे १३२, शिवसेना ५७, राष्ट्रवादी ४१, ठाकरे गट २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १० आणि इतर आमदारांना २ दिवसीय अधिवेशनात शपथ दिली जाणार आहे. या आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाईल. मागील वेळी असलेले राहुल नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होतील असं सांगितले जात आहे.
मंत्र्यांचा शपथविधी कधी?
मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शपथविधीत काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल अशी चर्चा होती परंतु शेवटपर्यंत खातेवाटप आणि इतर चर्चांमुळे केवळ तिघांचाच शपथविधी सोहळा पार पडला. आता उर्वरित मंत्रिमंडळ सदस्याचा शपथविधी कधी होणार ही चिंता इच्छुकांना लागली आहे. परंतु नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून शपथविधी सोहळा पार पाडला जाऊ शकतो.
दरम्यान ज्येष्ठता, गुणवत्ता, पक्षातील महत्त्व, प्रादेशिक समतोल, सामाजिक समतोल, संख्याबळ, जनतेचा पाठिंबा असे अनेक निकष लावून मंत्रिपदासाठी नाव निश्चित केले जाते. तसेच राजकीयदृष्ट्या कोण, किती उपयोगाचे हेही पाहिले जाते. निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच मंत्रिपदासाठीचे सगळे इच्छुक आमदार मुंबईत आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावून तयार आहेत. प्रत्यक्ष भेट, मागणी, मतदारसंघाची गरज अशा अनेक गोष्टी नेत्यांपर्यंत, पक्षश्रेष्ठींपर्यंत हस्ते, परहस्ते पोहोचवून त्यांनी जोरदार लॉबिंग केले आहे. वानखडेवर गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात किमान काही नावे घेतली जातील, अशी काहींना अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांची निराशा झाली.