आंबेडकर भवनासाठी आर्किटेक्टची नियुक्ती

By Admin | Updated: August 2, 2016 05:46 IST2016-08-02T05:46:24+5:302016-08-02T05:46:24+5:30

आंबेडकर भवनाचे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली.

Appointment of architect for Ambedkar Bhavan | आंबेडकर भवनासाठी आर्किटेक्टची नियुक्ती

आंबेडकर भवनासाठी आर्किटेक्टची नियुक्ती


मुंबई : आंबेडकर भवनाच्या पाडलेल्या भागाची पुनर्बांधणी करणे शक्य आहे का आणि आंबेडकर भवनाचे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली. प्रभू यांना या सर्व मुद्द्यांवर ८ आॅगस्टपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे.
दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन मोडकळीस आल्यासंदर्भात महापालिकेने पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला १ जुलै रोजी नोटीस बजावली. या नोटिशीची अंमलबजावणी करत, ट्रस्टने २५ जुलै रोजी आंबेडकर भवनाचा काही भाग पाडला. मात्र, डॉ. बाबासाहेब यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी याविरुद्ध आंदोलन केले, तसेच प्रकाश आंबेडकरांनी ३० जुलै रोजी ‘श्रमदान’ करून पुन्हा आंबेडकर भवन बांधण्याचे आवाहन समर्थकांना केले. त्यामुळे पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे होती.
शुक्रवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना आंबेडकर भवनात प्रवेश करण्यास मज्जाव केला, तसेच आंबेडकर भवन ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेशही दिला.
सोमवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आंबेडकर भवन व प्रकाश आंबेडकरांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले? आणि आता या भवनाची पुनर्बांधणी शक्य आहे का, हे तपासण्यासाठी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली, तसेच न्या. काथावाला यांनी प्रभू यांना ‘बुद्धभूषण’ या प्रिंटिंग प्रेसमध्ये असलेल्या वस्तूंची यादी सादर करण्याचेही निर्देश दिले.
प्रकाश आंबेकडर यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, काही साप्ताहिकांची आणि साहित्यावरील नियतकालिकांची या प्रिंटिंग प्रेसमधून छपाई होत असे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्यासाठी तेथे प्रवेश करायचा आहे.
सुनावणीदरम्यान न्या. काथावाला यांनी पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे आंबेडकर भवनाचा पुनर्विकास करावा, अशी सूचना केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी त्यास असहमती दर्शवली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ८ आॅगस्ट रोजी ठेवली
>प्रकाश आंबेडकर यांचा विरोध
‘एकत्रितपणे पुनर्विकास करण्याची कोर्टाची सूचना प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भवनाची सुरुवात आणि देखभाल केली आहे. त्यामुळे या भवनाशी नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत,’ असे आंबेडकरांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appointment of architect for Ambedkar Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.