शिशुपोषणासाठी अॅप
By Admin | Updated: August 5, 2016 02:12 IST2016-08-05T02:12:28+5:302016-08-05T02:12:28+5:30
मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटीच्या मदतीने तयार करण्यात आलेले ‘शिशुपोषण’ अॅप आतापर्यंत तब्बल १० हजार २३४ जणांनी डाऊनलोड करून घेतले

शिशुपोषणासाठी अॅप
मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालय व सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढाकाराने तसेच युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड), ब्रेस्टफीडिंग प्रमोशन्स नेटवर्क आॅफ इंडिया आणि मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटीच्या मदतीने तयार करण्यात आलेले ‘शिशुपोषण’ अॅप आतापर्यंत तब्बल १० हजार २३४ जणांनी डाऊनलोड करून घेतले आहे.
केईएम रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. कामाक्षी भाटे यांनी यासंदर्भात सांगितले की, शिशुपोषणासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संबंधित माहितीचा वापर होऊ शकतो. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर्स व संबंधित क्षेत्रातील संस्थांनी गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना शास्त्रशुद्ध माहिती देणारे अॅप तयार केले आहे. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषकतत्त्वे सुयोग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान देण्याची गरज असते. आईचे दूध योग्य प्रमाणात मिळाल्यास ते मूल अधिक निरोगी होते. या बाबी लक्षात घेऊन ‘शिशुपोषण’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. बाळाला स्तनपान कसे द्यावे? ते देताना कोणती काळजी घ्यावी? स्तनपानाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कसा व कोणता उपयोग होतो? तसेच नोकरी करणाऱ्या महिलांनी स्तनपान कसे सुरू ठेवावे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अॅपवर उपलब्ध आहेत. बाळाची सुयोग्य व निकोप वाढ होण्यासाठी काळजी काय घ्यावी? मातेचा आहार कसा असावा? यासारख्या बाबींवर शास्त्रशुद्ध माहिती अॅपवर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)