धनंजय मुंडे यांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 04:54 IST2016-08-17T04:54:16+5:302016-08-17T04:54:16+5:30
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटपप्रकरणी येथील अपर सत्र न्यायाधीश एन. एस. कोळे यांनी मंगळवारी विधान परिषेदेतील

धनंजय मुंडे यांना अटकपूर्व जामीन
अंबाजोगाई : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटपप्रकरणी येथील अपर सत्र न्यायाधीश एन. एस. कोळे यांनी मंगळवारी विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पुढील काळात चौकशीत सहकार्य करावे आणि संपत्तीचे संपूर्ण विवरण तपासी अधिकाऱ्यांना द्यावे, या अटीवर मुंडे यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणी त्यांना अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता केली जावी, असा आदेश न्यायाधीश कोळे यांनी दिला. या प्रकरणात याआधी दोघांना जामीन मंजूर झाला असून २० अर्ज प्रलंबित आहेत. मुंडे हे परळी येथील संत जगमित्र नागा सहकारी सूत गिरणीचे संचालक असताना या सूत गिरणीने कोणतीही मिळकत तारण न ठेवता ११ कोटी रुपयांची कर्जे जिल्हा बँकेकडून घेतली व या कर्जांची परतफेड केली नाही, अशी फिर्याद परळी पोलीस ठाण्यात सन २०१३ मध्ये मुंडे व इतरांवर नोंदविली गेली होती. गेल्या महिन्यात या प्रकरणी आरोपपत्र सादर केले गेले व त्यात मुंडे यांना फरार आरोपी दाखविण्यात आले होते. १२ आॅगस्ट रोजी मुंडे यांच्या वतीने मुद्दाम मुंबईहून आलेले अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम व त्यांचे स्थानिक सहकारी अॅड. अण्णासाहेब लोमटे यांनी तर अभियोग पक्षातर्फे पब्लिक प्रॉसिक्युटर अशोक कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला होता. (प्रतिनिधी)