सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका

By Admin | Updated: June 30, 2016 01:32 IST2016-06-30T01:32:36+5:302016-06-30T01:32:36+5:30

फर्ग्युसन महाविद्यालयातील शिपाई योगेश आनंद शिगवण याने बी़. एस्सी.च्या ६ विद्यार्थ्यांना एकूण १३ उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्याचे तपासात उघड झाले

Answer books provided by six students | सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका

सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका


पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील शिपाई योगेश आनंद शिगवण याने बी़. एस्सी.च्या ६ विद्यार्थ्यांना एकूण १३ उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्याचे तपासात उघड झाले आहे़ डेक्कन पोलिसांनी योगश शिगवण याला बुधवारी सकाळी अटक केली़
बी़ एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) ची परीक्षा एप्रिल २०१६ मध्ये झाली होती़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मूल्यमापनासाठी या उत्तरपत्रिका फर्ग्युसन महाविद्यालयाकडे आल्या होत्या़ या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांमधील १३ उत्तरपत्रिका शिगवण याने बाहेर काढल्या व त्या परदेशी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्या होत्या़ या विद्यार्थ्यांनी लिहून परत दिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा गठ्ठ्यात ठेवताना शिगवण याच्याकडून गफलत झाली़ त्यामुळे त्या तपासल्या गेल्या नाहीत व या विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर अनुपस्थित असा शेरा आला़ प्रत्यक्ष परीक्षेला हजर असताना त्यांच्या मार्कलिस्टवर अनुपस्थित असा शेरा कसा मारला गेला, याविषयी नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली़ तेव्हा या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पण उत्तरपत्रिका गायब झाल्याचे निष्पन्न झाले़
पोलिसांनी त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले़ ज्या विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिका पुरविल्या, त्यांचा शोध घ्यायचा आहे़ त्याचा कोणी साथीदार आहे का, यापूर्वी त्याने असा काही प्रकार केला आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने ती ग्राह्य धरून २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांनी चौकशी केल्यावर त्यात योगेश शिगवण याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर मंगळवारी रात्री डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ शिगवण याने याची कबुली दिली असून ज्यांना या उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्या, ते सर्व परदेशी विद्यार्थी असून पुनर्परीक्षार्थी आहेत़ या ६ विद्यार्थ्यांपैकी काहींचे एक, तर काहींचे दोन विषय राहिलेले होते़ त्याने प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी ३ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले़

Web Title: Answer books provided by six students