ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:52 IST2025-02-06T18:50:19+5:302025-02-06T18:52:27+5:30

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: उद्धव ठाकरे येणार आहेत तोपर्यंत तरी थांबा, अशी विनवणी नाराज पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

another blow to thackeray group the parbhani district chief joins shinde sena in presence of deputy cm eknath shinde | ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे.

अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून, ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच आता परभणी येथील जिल्हाप्रमुखांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव, शिंदे गटात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. नांदेड येथील एका कार्यक्रमात विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. विशाल कदम यांनी ठाकरे गटाकडून नुकतीच गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. बऱ्याच दिवसांपासून विशाल कदम ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा होती. अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विशाल कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

विशाल कदम यांचा शहरावर प्रभाव

विशाल कदम हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा या शहराचे माजी नगराध्यक्ष असून, या शहरावर त्यांचा प्रभाव आहे. ठाकरे गटात सक्रीय विशाल कदम सक्रीय असले तरी गंगाखेड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते अस्वस्थ होते. राजकीय पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या जिल्ह्यात पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतले असले तरी अजूनही यश आले नव्हते. विशाल कदम यांच्या रूपाने शिंदे यांच्या शिवसेनेला एक चांगला कार्यकर्ता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, पुण्यातही ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उद्धव ठाकरे पुणे दौरा करणार असून, काही शाखांना भेटी देणार असल्याचे समजते. त्यापूर्वीच ठाकरे गटातील काही पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत, उद्धव ठाकरे येणार आहेत तोपर्यंत थांबा, असे नाराज पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.
 

Web Title: another blow to thackeray group the parbhani district chief joins shinde sena in presence of deputy cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.