आणखी २७रुग्ण स्वाइनग्रस्त
By Admin | Updated: February 16, 2015 03:53 IST2015-02-16T03:53:18+5:302015-02-16T03:53:18+5:30
मुंबईत रविवारी एका दिवसात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक म्हणजे २७ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत स्वाइन फ्लूच्या

आणखी २७रुग्ण स्वाइनग्रस्त
मुंबई : मुंबईत रविवारी एका दिवसात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक म्हणजे २७ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण एका दिवसात आढळले होते. पण रविवार, १५ फेब्रुवारी रोजी २७ स्वाइनचे रुग्ण आढळले असून त्यापैकी १३ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. दीड महिन्यात स्वाइनचे १०७ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.
चार वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूने मुंबईत हातपाय पसरले होते. पण यावर महापालिकेने नियंत्रण आणले होते. २०१५ च्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा स्वाइनचा जोर वाढला आहे. रविवारी १ ते ५ वयोगटातील लहान मुलांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. अंधेरी येथील ३ वर्षीय मुलाला, महालक्ष्मी येथील ५ वर्षीय मुलीला, मलबार हिल येथील ३ वर्षीय मुलाला, गावदेवी येथील ३ वर्षीय मुलीला, अंधेरी येथील ५ वर्षीय मुलीला, अंधेरी येथील ३ वर्षीय मुलीला, मालाड येथील ३ वर्षीय मुलाला, पेडर रोड येथील १ वर्षीय मुलीला आणि ग्रॅण्ट रोड येथील २ वर्षीय मुलीला स्वाइनची लागण झाली आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. महालक्ष्मीच्या ५ वर्षीय मुलाला आणि ग्रॅण्ट रोडच्या २ वर्षीय मुलीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.