घोषणांचा पाऊस - कृतीचा दुष्काळ !

By Admin | Updated: July 16, 2014 01:22 IST2014-07-16T01:22:47+5:302014-07-16T01:22:47+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांनी शहराची वाट लावली आहे.

Announcements of rain - Drought of action! | घोषणांचा पाऊस - कृतीचा दुष्काळ !

घोषणांचा पाऊस - कृतीचा दुष्काळ !

मनपातील सत्ताधाऱ्यांचे ‘उल्लू बनाविंग’
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांनी शहराची वाट लावली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरकरांना न पेलणारी आश्वासने दिली. विकासासाठी मोठमोठी स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात एकही स्वप्न पूर्णपणे वास्तवात साकारले नाही. मान्सूनच्या पावसासारख्या घोषणा होतात. ऊन वाढले की जलसाठ्यासारख्या घोषणाही आटतात. हा गेल्या अडीच वर्षांच्या महापालिकेतील सत्तेचा परिपाक आहे.
चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. गडकरींनी तीन लाखांचे मताधिक्य मिळविले. त्यामुळे आता सहाही विधानसभेत ‘फिल गुड’ आहे अन् मदतीसाठी गडकरी आहेच, विकास कामे केली नाही तरी नागपूरकर गडकरींकडे पाहून मते देतील, असा समज इच्छुक उमेदवारांसह पक्षाने करून घेतला आहे. एकीकडे गडकरी व प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस देश व राज्य दुरुस्त करायला निघाले आहेत. पण येथे ‘होम टाऊन’मध्ये आपल्याच सत्ताधाऱ्यांवर वचक नाही.
महापालिकेतील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करीत आहेत. अनेक प्रकल्पांच्या घोषणा झाल्या, मात्र त्या पूर्णत्वास आलेल्या नाही. विलंबासाठी पदाधिकारी प्रशासनाकडे बोट दाखवितात. पण प्रशसानावर पकड निर्माण करणे हे सत्ताधाऱ्यांचेच काम आहे. अशी कारणे देऊन ते स्वत:चे अपयश लपवून नागरिकांची दिशाभूल करू पाहात आहेत. नागपूरकर बोलत नाहीत, पण करून दाखवितात. आता पुरे झाले. ‘नो उल्लू बनाविंग’ असे नागपूरकर बोलू लागले आहेत. शहरात ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल करू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Announcements of rain - Drought of action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.