शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर
By Admin | Updated: July 20, 2016 00:36 IST2016-07-20T00:36:17+5:302016-07-20T00:36:17+5:30
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अभ्यासक्रम मंगळवारी राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर
पुणे : विद्यार्थी व पालक प्रतीक्षेत असलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अभ्यासक्रम मंगळवारी राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आला. बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही त्यादृष्टीने भर पडावी, अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता चौथी व सातवीऐवजी पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला पसंती देतात. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असतो. यावर्षी पहिल्यांदाच पाचवी व आठवीसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याने सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र, शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे अभ्यासक्रम जाहीर करण्यात आले.
परीक्षेसाठी उपयुक्त मराठी माध्यमातील चार मार्गदर्शिकांचेही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले आहे. या वेळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमांतून होणार आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा विविध बदल करण्यात आले आहेत. पारंपरिक प्रश्नांना बगल देत आता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, तर्कशास्त्र, व्यावहारिक ज्ञान, भाषेचा व्यवहारात उपयोग, इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे, साहित्याचे प्रकार किती, लेखक कोण, गणितामध्ये सूट (डिस्काउंट) म्हणजे काय, यांसह तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ई-मेल, एसएमएस, कमिशन अशा विविध संकल्पनांशी संबंधित प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
याबाबतच्या मार्गदर्शन पुस्तिका शिक्षक, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ मराठी भाषेतील मार्गदर्शिका उपलब्ध झाल्या आहेत. अन्य भाषांविषयांचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
>प्रश्नांची काठिण्यपातळी
सोप्या स्वरूपाचे प्रश्न - ३० टक्के
मध्यम स्वरूपाचे प्रश्न - ४० टक्के
कठीण स्वरूपाचे प्रश्न - ३० टक्के
इयत्ता आठवीसाठीच्या दोन्ही पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांबाबत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.