पुण्यात नव्या विमानतळाची घोषणा
By Admin | Updated: February 16, 2016 03:35 IST2016-02-16T03:35:38+5:302016-02-16T03:35:38+5:30
पुणे येथील नवीन विमानतळासाठी जागेची घोषणा लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले, तसेच नवी मुंबई विमानतळावरील पहिले टेक

पुण्यात नव्या विमानतळाची घोषणा
मुंबई : पुणे येथील नवीन विमानतळासाठी जागेची घोषणा लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले, तसेच नवी मुंबई विमानतळावरील पहिले टेक आॅफ आपल्या याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१९ पूर्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत, ‘मेक इन महाराष्ट्र - यशासाठीची नवी रणनीती’ या विषयावरील चर्चासत्रात फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर, रासायनिक व खते राज्यमंत्री हंसराज
अहीर, जेव्हीके समूहाचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय
संचालक जेव्हीके रेड्डी, जेएसडब्ल्यू स्टील लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल
आणि राज्याचे मुख्य सचिव
स्वाधिन क्षत्रिय यांनी विचार व्यक्त केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुण्यातील सध्याच्या विमानतळाचा विस्तार केला जाईल. त्यासाठी संरक्षण विभागाची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिवाय, भविष्यासाठी नवीन विमानतळ उभारले जाईल.’
या चर्चासत्रात गडकरी, जावडेकर, प्रभू आणि अहीर या महाराष्ट्रातील चारही मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. (विशेष प्रतिनिधी)देशात येत्या तीन वर्षांत २ लाख २० हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बांधण्यात येतील. त्यातील ६८ हजार कोटी रुपये खर्चाचे रस्ते येत्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहीर केले.
डहाणू पोर्ट तीन वर्षांत : डहाणू येथे बंदराची निर्मिती येत्या तीन वर्षांत केली जाईल. येत्या मार्चपासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.
इमारतींच्या मंजुरीचे विकेंद्रीकरण - जावडेकर : पर्यावरणविषयक मंजुरीची एकही फाइल आपल्या टेबलवर पेंडिंग नसल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात ६ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पर्यावरणविषयक मंजुरी मिळाली. पर्यावरणाचे संरक्षण पण जलद विकासाची हमी हे आपले सूत्र आहे. इमारतींच्या पर्यावरणविषयक मंजुरीचे विकेंद्रीकरण लवकरच केले जाईल, असे ते म्हणाले. मुंबई विमानतळासाठी जमीन द्या - रेड्डी
विमानतळ उभारणी क्षेत्रातील नामवंत जेव्हीके रेड्डी यांनी महाराष्ट्रात आगामी ५०-१०० वर्षांतील प्रवासी आणि मालवाहतुकीचा विचार करून विमानतळांची उभारणी केली जावी, असे मत व्यक्त केले. मुंबई विमानतळाशेजारील ३०० एकरपेक्षा अधिक जागा झोपड्यांनी आक्रमिलेली आहे. ही जागा मोकळी करून दिल्यास या विमानतळाचा विकास होईल, असे सांगून राज्य सरकार त्यासाठी कार्यवाही करीत असल्याचे रेड्डी म्हणाले.