Operation Sindoor: पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर देशभरातून आनंद, जल्लोष करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आली. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, हे जे प्रकरण घडले, त्याचे जगासमोर उदाहरण आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया होतात, हल्ले होतात. आता कुणाची हिंमत होणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करणे सोपे नाही. पण भारतीय सैन्याने करून दाखवले, या शब्दांत अण्णा हजारे यांनी कौतुकोद्गार काढले.
‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच
भारतीय लष्कराने केलेल्या कामाचे कौतुक शब्दांत करता येणार नाही. इतके सुंदर काम लष्कराने केले आहे. भारत स्वतःहून कोणाची छेड काढणार नाही. मात्र दुसऱ्याने छेड काढली तर सोडायचे नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर ही कारवाई योग्यच आहे. काही कारण नसताना आपले २६ लोक मारले गेले. त्याचाच सूड भारताने घेतला आहे. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचीही हिंमत होणार नाही, असे अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले.