Anjali Damania: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यानंतर अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले. यानंतर आता अमित शाह यांच्या दौऱ्यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
एकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसपूस सुरू असताना अमित शाह यांचा रायगड दौरा आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम राजकीय वर्तुळात अगदी चर्चेचा विषय ठरला. अमित शाह यांची ही भेट कौटुंबिक होती. या भेटीत अमित शाह यांच्याबरोबर मनमोकळेपणाने चर्चा झाली. तसेच अमित शाह यांच्या जेवणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. आमच्या विनंतीला मान देऊन अमित शाह हे घरी आले, शाह यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला, असे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करून अमित शाह यांच्या दौऱ्यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे.
अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी?
जनतेच्या कष्टाने कमवलेल्या करायच्या पैशातून तटकरेंसाठी खास HELIPAD? ती पण चार चार Helipad? अमित शाह भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाह ना जेवायला घालायचय, खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना ? मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा. देवेंद्र फडणवीसांचे पुनःश्च अभिनंदन. सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकार मधे खूपच चांगला ताळमेळ जाणवतो, असे अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी महायुतीत मानापमान नाट्य पाहायला मिळाले. अमित शाह थेट सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले म्हटल्यावर शिवसेना शिंदे गटात चांगलीच चलबिचल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या स्नेनभोजनाच्या कार्यक्रमाला भरत गोगावले अनुपस्थित राहिले. यावर, माझे कर्तव्य होते, मी भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. पण मी माझे कर्तव्य केले. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजे. बाकी त्याबद्दल आणखी काही बोलणार नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते.