Anjali Damania News: राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भुजबळांच्या शपथविधीवरून विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली. अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, वाह फडणवीस वाह! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? की सभ्य माणसे मिळत नाहीत राजकारणात? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली आहे.
किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या घोषणा आठवतात? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”, हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, १९९१ पासून विविध विभागांचा मंत्री बनत आलेलो आहे. मुख्यमंत्री जे खाते देतील, ते सांभाळीन. गृहमंत्रालयापासून ते सगळे काही सांभाळले आहे. मला कोणतीही जबाबदारी दिली तरी चालेल. हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दिली.